भविष्यात रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहणार नाही : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 03:14 PM2019-12-29T15:14:38+5:302019-12-29T15:14:52+5:30
पनवेल तालुक्याचा समावेश असलेला रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते.
पनवेल : भविष्यात रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही., याची काळजी वाटत आहे. याकरिता याठिकाणच्या युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज असल्याचे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दि.29 रोजी पनवेल येथे व्यक्त केले. व्ही. के. हायस्कुलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पनवेल तालुक्याचा समावेश असलेला रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. सध्याच्या घडीला याठिकाणी कारखानदारी वाढत चालली असल्याने अशा परिस्थितीत युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला माझा पाठिंबा होता. मात्र शिक्षणाचे सार्वत्रीकरण होत असताना या शिक्षणामध्ये गुणवत्ता असणे गरजेचे आहे, असे मत पवारांनी व्यक्त केले.
यावेळी व्ही के हायस्कुलचे माजी विद्यार्थी व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील पनवेल मधील शालेय जीवनातील आठवणी यावेळी ताज्या केल्या. शरद पवार यांचा पक्ष वेगळा असला तरी नगरसेवक ते खासदार असेपर्यंत त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही के हायस्कुलचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षीताई पाटील, विवेक पाटील, जे एम म्हात्रे आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.