फारुक काझीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; महाड दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:26 PM2020-09-11T23:26:13+5:302020-09-11T23:26:13+5:30
संतप्त जमावाकडून आरोपीच्या गाडीला घेराव
महाड : महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या फारुक काझी याला शुक्रवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सात दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर, काझी याला महाड न्यायालयातून अलिबाग येथे पोलीस गाडीतून नेत असताना, पोलीस ठाण्याच्या आवारात जमलेल्या या दुर्घटनेतील मृतांच्या संतप्त नातेवाइकांनी, तसेच या इमारतीतील रहिवाशांनी काझी असलेली पोलीस गाडी अडवून घेराव घातला. आरोपी काझीला शिवीगाळ करीत याला आमच्या ताब्यात द्या, निष्पापांचे बळी घेणाऱ्याला फासावर लटकवा, असा आक्रोश केला. महाड न्यायालयाच्या आवारात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगवले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
यावेळी डीवायएसपी शशिकांत काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पंकज गिरी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील फरार आरोपी असलेला बिल्डर फारुक काझी हा माणगाव न्यायालयात शरण आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर फारुक काझीला महाड न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी आणले होते. मात्र, काझीला न्यायालयात आणणार असल्याचे समजल्यानंतर, शुक्रवारी सकाळी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांनी आणि रहिवाशांनी शहर पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. फारुक काझी याला पोलीस बंदोबस्तात अलिबाग येथे रवाना करण्यात आले.
२४ आॅगस्ट रोजी महाड शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून सोळा रहिवाशांचे बळी गेले होते, तर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन ही कुटुंबे बेघर झाली आहेत. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बिल्डर फारुक काझीसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते, यापैकी फारुक काझीसह, आरसीसी डिझायनर्स बाहुबली धामणे, युनूस रज्जाक शेख या तिघांना अटक केली असून, तिघे आरोपी अद्यापही फरारी आहेत.