महामार्गावर शीघ्र प्रतिसाद व्हॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2015 02:55 AM2015-12-28T02:55:23+5:302015-12-28T02:55:23+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे. हे अपघात थांबविण्याकरिता रस्ते विकास महामंडळाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून
अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे. हे अपघात थांबविण्याकरिता रस्ते विकास महामंडळाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी शीघ्र प्रतिसाद व्हॅनची (क्यूआरव्ही)व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे अपघातग्रस्तांना मोठा फायदा होत असून, अनेकांचे प्राण वाचविण्यातही यश मिळाले आहे. म्हणून क्यूआरव्ही खऱ्या अर्थाने जीवदायी ठरत आहे.
साधारण १०० कि.मी लांबीच्या या द्रुतगती मार्गावरून तासी ८० कि.मी. वेगमर्यादा आहे. मात्र ही वेगमर्यादा ओलांडली जात असल्याने टायर फुटणे, वाहनावरील ताबा सुटणे, दरीत वाहन कोसळणे, वळणाला अपघात होणे, अचानक गाडीला आग लागणे अशा घटना वारंवार घडतात. त्याचबरोबर ओव्हरटेकच्या नादात अवजड वाहनांचेही अपघात वाढले आहेत. रस्ते विकास महामंडळाने अपघात रोखण्याकरिता आपत्कालीन यंत्रणा विकसित केली आहे. आर्यन पंप या कंपनीच्या सहकार्याने महामंडळाने शीघ्र प्रतिसाद व्हॅन द्रुतगती महामार्गावर आणल्या आहेत. सुरुवातीला लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर पहिली व्हॅन सुरू करण्यात आली. घाटात होणाऱ्या अपघातस्थळी त्वरित पोचून बचाव करण्यास ही यंत्रणा यशस्वी ठरली. त्यामुळे आणखी तीन व्हॅन याच महामार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तळेगाव, खालापूर आणि पनवेलचा समावेश करण्यात आला आहे. व्हॅनवर प्रशिक्षित रेस्क्यू आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. खालापूर आणि लोणावळा येथील व्हॅनला अधिक कॉल येतात. तिथे मोठ्या प्रमाणात बचावकार्य आर्यन पंपच्या पथकाने केले आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवले आहेतच. त्याचबरोबर वाहतूक नियमन तसेच रहदारीस अडथळा होऊ नये याकरिता मदत केली आहे. आगीच्या घटना घडल्यानंतर त्या विझविण्याकरिता व्हॅन सर्वात आधी पोहोचते.