- अमोल पाटील, खालापूरराज्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये कोकणातील एकमेव खालापूर तालुक्याचा समावेश आहे. आजही तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणे, नद्या उशाला मात्र कोरड घशाला अशीच केविलवाणी अवस्था येथील जनतेची पाण्यावाचून झाली आहे. २०१६ च्या उन्हाळ्यातील टंचाई कृती आराखड्यात २२ गावे, ३१ वाड्यांचा समावेश आहे. खालापूर तालुका हा कोकणातील आणि राज्यातील प्रगत तालुक्यांच्या यादीत समाविष्ट आहे. मुंबई-पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण खालापूर तालुका आहे. गेल्या काही दशकांत तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढल्याने दरडोई उत्पन्न वाढले आहे. औद्योगिकीकरणाला पुरेसे पाणी तालुक्यात उपलब्ध असल्याने तालुक्याच्या सर्वच भागांमध्ये कारखानदारी वाढली आहे. पाताळगंगा नदी, अंबा नदी, दोनवत, कलोते धरण, आटकरगाव, नदाल पाझर तलाव, मोरबेसारखा नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरण आदी लहान-मोठी धरणे तालुक्यात आहेत. मुबलक पाणी डोळ्यासमोरून वाहून जाते, तर पाण्याचा मोठा साठा डेड वॉटर म्हणून शिल्लक असूनही तालुक्यातील जनतेला पाण्यावाचून तडफड करावी लागत आहे. ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक योजना राबविल्या, मात्र सर्वच जलधारा योजना अर्धवट अवस्थेत सुरू आहेत. त्या निकामी असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड गेली अनेक वर्षे नागरिक करीत आहेत. तालुक्याच्या दोनवत येथे धरण आहे. मात्र दोनवत, किरखिंडीसह आदी गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे, तर कमी पुरवठा आहे. ही वस्तुस्थिती गेली अनेक वर्षे कायम असल्याने उत्तम स्टीलसह गोदरेज आदी कंपन्यांनी पुढाकार घेऊन या गावांना पाणी देण्याविषयी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे. यासह सावरोली, देवनावे, खालापूर, वावोशी, माजगाव, माडप, नावंडे, सारसन, वढवल आदी गावांच्या हद्दीत वेगवेगळे कारखाने, गृहप्रकल्प, खासगी प्रकल्प सुरू आहेत. हे सर्वजण पाणी नदीपात्रातून उचलत असून, या सर्वांनी जॅकवेल नदीकिनारी उभ्या केल्या आहेत.पाइपलाइनद्वारे पाणी गावांच्या हद्दीतून वाहून नेले जात असल्याने या पाइपलाइनद्वारे काही अंशी पिण्यासाठी पाणी जर उपलब्ध करून दिले तर भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचाच निकालात निघेल. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या मास्टर प्लानबाबत पत्र मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक दर्गे यांनी खालापूर तहसीलदार यांना दिले आहे.पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन आम्ही योग्य त्या उपाययोजना करीत आहेत. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे, त्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.पाण्याच्या बाबतीत शासन संवेदनशील आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक पाऊल उचलेल. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जे जे करणे शक्य आहे ते ते करण्याचा आमचा मानस असून, उद्योगांनी सामाजिक भावनेतून पाणी दिल्यास आम्ही स्वागत करू.-अजित नैराळे, तहसीलदार
खालापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: March 29, 2016 3:21 AM