ओलमण परिसरात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: March 30, 2016 01:20 AM2016-03-30T01:20:55+5:302016-03-30T01:20:55+5:30
रायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही
- कांता हाबळे, नेरळ
रायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. जवळच्या विहिरी आटल्याने दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी चढाव चढत आणावे आहे. काही जण तर बैलगाडीने पाणी आणताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता ओलमण भागातील ओलमण, पेंढरी, तेलंगवाडी, बोडशेतं, चाहूची वाडी या टंचाईग्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कर्जत तालुक्यात शासनाने पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात ३४ गावे व ४१ वाड्या आहेत. त्यात ओलमण गावाचाही समावेश आहे. मात्र आजूबाजूच्या वाड्यांचा समावेश नाही. परंतु तालुक्यात अद्याप एकाही गावाला शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात सुरुवात झाली नाही. ओलमण गावासाठी १९९८ मध्ये एक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मुरबाड तालुक्यातील पाटगाव हद्दीतील ओहळातून हा पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना नादुरु स्त आहे. तेव्हापासून पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. ओलमण गावात ८० ते ८५ घरांची वस्ती असून, येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. तेलंगवाडी, बोंडशेतं, पेंढरी, कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूची वाडी या आदिवासी वाड्यांमधील महिलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरी व बंधारे आटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओलमण गावापासून एक ते दीड किमी अंतरावरून मोठा चढाव चढत महिलांना पाणी आणावे लागत आहे.
कर्जतमध्ये टँकर नाही
शासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु यात कोणाला पाणी मिळते तर कोणाला मिळत नाही. चांगल्या दर्जाचे पाणी नसल्याने या पाण्याने आजाराचे प्रमाणही वाढते, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. परंतु अद्याप शासनाकडून कर्जत तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याने लवकर सुरु करावा.
कर्जत तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे. आ. सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईसंदर्भात बैठक घेतली होती. यात फक्त ओलमण गावाचाच समावेश आहे. माणसे पाठवूनही वाड्यांचा समावेश या टंचाई आराखड्यात केला नाही.
-अशोक थुले, गटविकास अधिकारी प. सं. कर्जत.
दरवर्षीप्रमाणे आमच्या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास असणाऱ्या विहिरी आटल्या असून, महिलांना दीड ते दोन किमी अंतरावरून चढाव चढून पाणी आणावे लागत आहे. या भागातील कायमसाठी पाणीटंचाई सोडविण्यासाठी ओलमण गावालगत पाझर तलाव बांधणे गरजेचे आहे, जेणेकरून कायमचा पाणीप्रश्न सुटेल.
- दादा मनोहर पादीर, माजी सरपंच, ओलमण