एचपीसीएल गॅस पाइपलाइनविरोधात १४ मार्चपासून उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:10 AM2018-03-13T03:10:14+5:302018-03-13T03:10:14+5:30
गॅस लाइन लोकवस्तीऐवजी नदीकिना-यावरून किंवा गावाबाहेरून शासकीय जागेतून न्यावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा व गॅस लाइन हटाव कृती समितीच्या वतीने पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर गावकरी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : उरण (भेंडखळ) ते शिक्रापूर-चाकण ही १६४ किलोमीटरची हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(एचपीसीएल) कंपनीची १२ इंच (एक फूट) व्यासाची एलपीजी गॅस पाइपलाइन ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा हद्दीतील दुष्मी, ठाकूरपाडा व खारपाडा गावांतील लोकवस्तीतून बेकायदा पद्धतीने टाकण्याचे सुरू केलेले काम तत्काळ थांबवून ही गॅस लाइन लोकवस्तीऐवजी नदीकिना-यावरून किंवा गावाबाहेरून शासकीय जागेतून न्यावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा व गॅस लाइन हटाव कृती समितीच्या वतीने पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर गावकरी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली.
ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी, खारपाडा आणि गॅस लाइन हटाव कृती समितीच्या वतीने ६ मार्च रोजी अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला होता, परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे बुधवारी १४ मार्चपासून सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरेश ठाकूर,जनीबाई ठाकूर, सतीश अंबाजी, हिरामण घरत, सचिन पाटील आदींसह दुष्मी ठाकूरपाडा गावांतील शेकडो ग्रामस्थ पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र रायगडच्या जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
एचपीसीएल गॅस पाइपलाइन दुष्मी, ठाकूरपाडा व खारपाडा गावांतील लोकवस्तीतून न टाकता पर्यायी म्हणजे पाताळगंगा नदी किनाºयामार्गे नेण्यात यावी.
नियमबाह्य काम करणाºया एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे.
गॅस लाइन खारपाडा-सावरोली राज्य मार्ग १०४ च्या मध्यापासून १५ मीटर अंतरापलीकडे टाकण्यात यावी असे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या परवानगीमध्ये स्पष्टपणे नमूद असताना, एचपीसीएल कंपनी व ठेकेदार रस्त्याच्या अगदी कडेला गॅस लाइन टाकत आहेत. या नियमबाह्य कामात पेण सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधितांना सहकार्य करीत आहे. त्यांच्यावर फसवणूक व कर्तव्यात कसूर केल्याचे गुन्हे दाखल करण्यात यावे.