लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरु ड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वीज मंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असून, विजेचा पुरवठा कायम न ठेवल्याने येथील स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसताना ही वीज अनेक तास गायब होत असून, दिवसा गेलेली वीज मध्यरात्रीनंतर येत असल्याने लोकांची झोप उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वीज का गायब होत आहे? याचे साधे स्पष्टीकरणसुद्धा देता येत नसेल, तर हा अन्याय मुरुड तालुक्यातील नागरिकांनी का सहन करावा? या लोकभावनेतून नांदगाव येथे राहणारे समाजसेवक चिंतामणी गोपाळ जोशी हे मुरुड तहसील कार्यालयाजवळ ५ जुलैपासून उपोषणास सुरु वात करणार आहेत. याबाबतचे रीतसर निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून, त्याच्या प्रती ऊर्जामंत्री, पालकमंत्री रायगड तसेच वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला पाठवल्या आहेत.विद्युत मंडळाच्या गेल्या वर्षभरातला जो अनागोंदी कारभार आहे. त्याला त्रासूनच लोकांचा जनक्षोभ उसळून आला होता. जे अधिकारी हलगर्जी करीत होते व करीत आहेत. खरी कारवाई त्यांच्यावरच होणे आवश्यक आहे. तसे न करता, रागाची भावना व्यक्त करणाऱ्या असाहाय्य व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले, तरी याबाबतीत जर समाजाला योग्य न्याय द्यावयाचा असेल, तर संबंधित वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे. जर प्रशासनाला अधिकारी वर्गावर कार्यवाही करावयाची नसेल तर संबंधितांवरचे गुन्हेसुद्धा मागे घेण्यात यावेत, अशी मागणी चिंतामणी जोशी यांनी निवेदनात नमूद केली आहे.वीज मंडळाचा हा त्रास वाढला असून, कायमस्वरूपी मुरुडमधील नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी लोकशाही मार्गाने हा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त करून ५ जुलैपासून तहसील कार्यालयाजवळ उपोषणास बसण्याचा इशारा जोशींनी दिला.
वीज मंडळाविरोधात ५ जुलैपासून उपोषण
By admin | Published: June 28, 2017 3:25 AM