पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या प्रशासनाविरु द्ध पालकांनी सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे शनिवारी येथे आले असता पालकांनी त्यांची गाडी अडवली. अखेर त्यांनी वरिष्ठांशी बोलणी करून आदेश देऊ, असे सांगून सुटका करून घेतली. शनिवारी उपोषणकर्त्या राजश्री निंबाळकर यांची प्रकृती खालवल्याने डॉक्टरांनी रुग्णालयात हलवण्यास सांगितले. शनिवारी दुपारी जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे व गटशिक्षण अधिकारी माधुरी कुबेरकर उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आले. आम्हाला आश्वासन नको, तर आता कारवाई हवी त्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे पालकांनी त्यांना सांगितले. ते जायला निघाल्यावर महिला पालकांनी त्यांची गाडी अडवून धरली. या वेळी माजी नगराध्यक्षा चारु शीला घरत व भाजपाच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. अखेर कार्यालयात जाऊन आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय लेखी स्वरूपात देतो, असे सांगून सोबत पालक प्रतिनिधींना घेऊन जाण्यास तयार झाल्यावर पालकांनी त्यांचा रस्ता सोडला.यापूर्वी शुक्रवारी रात्री मनीषा पाटील यांना पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सकाळी सोडण्यात आले. शनिवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणी केली असता राजश्री निंबाळकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. अखेर त्यांना पटवर्धन रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)
पालकांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
By admin | Published: February 19, 2017 3:52 AM