२३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सहा नगर पंचायतींच्या ७९ जागांसाठी ७४ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:33 AM2021-12-22T00:33:54+5:302021-12-22T00:36:33+5:30
सहा नगर पंचायतींमधील ७९ जागांसाठी ८२ मतदान केंद्रावर मतदानाला मंगळवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली. ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. त्यानुसार मतदार राजामध्येही कमालीचा उत्साह दिसून आला.
रायगड- जिल्ह्यातील तळा, खालापूर, म्हसळा, माणगाव, पोलादपूर आणि पाली (नवनिर्मित) या सहा नगर पंचायतीच्या (Nagar Panchayat) ७९ जागांसाठी ७४.२० टक्के मतदान झाले. २३३ उमेदवारांचे भवितव्य निवडणूक यंत्रामध्ये मंगळवारी मतदार राजाने बंद केले. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीमध्ये कोठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
सहा नगर पंचायतींमधील ७९ जागांसाठी ८२ मतदान केंद्रावर मतदानाला मंगळवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली. ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. त्यानुसार मतदार राजामध्येही कमालीचा उत्साह दिसून आला. काही मतदार काम-धंद्यानिमित्त मुंबई, ठाणे या ठिकाणी राहतात. मात्र मतदानासाठी ते न चुकता गावामध्ये येतात. अशा मतदारांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदार केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांच्या घरी जाऊन मतदानाला येण्यासाठी विनंती करत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीची लगबग सुरू होती. वयोवृद्धांनी कुटूंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
दुपारनंतर मतदारांची संख्या रोडावली -
सकाळी साडेसात ते साडेअकरा या कालावधीत सहा नगर पंचायतीमध्ये ३३.६६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर उन्हाचा कडाका असल्याने मतदानासाठी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडला नाही. दुपारी दीड वाजेपर्यंत ५२.९ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतरही मतदानासाठी येणाऱ्याची संख्या रोडावली होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६८.५३ टक्के मतदारांनी मतदान केले. महिलांसह वयोवृद्धाही मतदान करण्यासाठी पुढे आल्याचे दिसून आले.
खालापूर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक मतदान -
सहा नगर पंचायतींसाठी ७४.२० टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये खालापूर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक मतदान झाले. खालापूर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक ८४.४६टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्या खोलाखाल तळा ७३.८२ टक्के, पोलादपूर ७१.९२ टक्के आणि माणगाव ७०.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. म्हसळा ६८.५० टक्के मतदान झाले. नवनिर्मित झालेला पाली नगर पंचायतीमध्ये प्रथमच मतदान होत आहे. या ठिकाणी ७८.६६ टक्के मतदारांनी मतदान केले.
पाली नगरपंचायतीसाठी प्रथमच मतदान -
पाली नगर पंचायत नव्याने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानासाठी चांगलीच उत्सुकता होती. पालीमधील मतदारांनी १३ उमेदवारांसाठी मतदान केले. पालीमध्ये ७८.६६ टक्के मतदान झाले. ४७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
उमेदवारांची धाकधूक कायम -
ओबीसी आरक्षणाच्या २१ जागा या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारी २०२१ रोजी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक कायम राहणार आहे.
पंधरा दिवसांपासून प्रचाराचा धुरळा -
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांनी आपपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नगर पंचायतीवर आपल्याच राजकीय पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी सर्वांनी गेल्या पंधरा दिवसांपासून चांगलीच कंबर कसली होती. प्रत्यक्षात मतदान पार पडले आहे. मतदाराजा कोणाच्या पारड्यामध्ये कौल देणार, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सहा नगरपंचायतींसाठी मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात तक्रारी आल्या होत्या, मात्र कोठेही गडबड गोंधळ झाला नाही, असे उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले.