उमेदवारांचे भवितव्य आज होणार स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 07:13 AM2018-05-28T07:13:30+5:302018-05-28T07:13:30+5:30
रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींपैकी १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी ५६२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींपैकी १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी ५६२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील वृद्ध व अपंग मतदारांनीदेखील उत्स्फूर्तपणे मतदान केले. जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ८० टक्केपर्यंत मतदान झाले आहे. रोह्यात दुपारपर्यंत ७० टक्के, महाडमध्ये ६५ टक्के, अलिबागमध्ये ७० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील एकूण मतदानाची आकडेवारी ५.३० वाजेपर्यंत ८० टक्के एवढी झाली होती.
रायगड जिल्ह्यात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, भाजपा या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी ताकद लावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तप्त होते.
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर १८७ ग्रामपंचायतींपैकी ३९ सरपंच, तर १६४७ पैकी ५५३ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १४४ जागांसाठी २५८२ विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी ७.३० ते सायं. ५.३० यादरम्यान पार पडलेल्या मतदार प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.
सकाळी जिल्ह्यात ७.३० वा. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक १६.४५ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी १८.९७ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत सार्वत्रिक ३७.८५ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी ४२.२१ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक ५७.३६ टक्के तर पोटनिवडणुकीसाठी ६० टक्के मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक ६९.१५ टक्के तर पोटनिवडणुकीसाठी ६८.३४ टक्के मतदान झाले.
सकाळी ७.३०ला जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत मतदारांची मतदानासाठी गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. त्यानंतर मात्र सर्वच मतदानकेंद्रांवर मतदारांची गर्दी वाढू लागली होती. आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला अधिकाधिक मते मिळवण्याकरिता कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असतानाच मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार स्वेच्छेने आणि मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडताना दिसत होते. मतदान केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय अधिक लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी गस्त घालताना दिसून येत होते. २७६ होमगार्ड, ८० आरपीसी जवान, स्टॅटिक फोर्सचे १६० जवान तसेच ६ स्ट्रायकिंग फोर्स, जिल्ह्यातील नियमित ७५४ पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताकरिता साहाय्य करीत होते. तर मतदान प्रक्रियेसाठी महसूल विभागाच्या ९८ अधिकाºयांसह ७५३ अधिकारी तैनात करण्यात आले होते.
सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. कोणत्याही मतदान केंद्रावर अनूचित घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिली.
सोमवारी होणाºया मतमोजणीकरितादेखील पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीकरिता सकाळीच बंदोबस्त तैनात करण्यात येणार
आहे.