वडिलांना वाहिली अनोख्या पद्धतीने आदरांजली
By Admin | Published: March 4, 2017 04:30 PM2017-03-04T16:30:18+5:302017-03-04T16:31:02+5:30
सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे राजकारणी वा नेते आपल्या मृत पावलेल्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या समारंभाचे आयोजन करुन अमाप खर्च करण्याची प्रथा सुरू झाली आहे.
ऑनलाइन लोकमत/जयंत धुळप
अलिबाग, दि. 4 - सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे राजकारणी वा नेते आपल्या मृत पावलेल्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या समारंभाचे आयोजन करुन अमाप खर्च करण्याची प्रथा सुरू झाली आहे. पण, या परंपरेला छेद देणारी घटना अलिबाग येथे घडली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.अॅड.दत्ता पाटील यांचे चिरंजीव आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे (कोएसो )विद्यमान अध्यक्ष संजय पाटील यांनी समाजापुढे आदर्श निर्माण करणारा उपक्रम राबवला आहे.
गेल्या पाच वर्षापासून आपल्या स्वर्गीय पित्यांच्या वाढदिवशी स्वकष्टाच्या उत्पन्नातून 1 लाख 1 हजार रुपयांची भौतिक सुविधा विकास निधी कोकण एज्युकेशन सोयायटीच्या एका शाळेस देण्याची आदर्शवत आगळीवेगळी परंपरा त्यांनी निर्माण केली आहे.
यंदा स्व.अॅड.दत्ता पाटील यांच्या 91 व्या जयंती दिनी अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील को.ए.सो.धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरला किणी यांना या निधीचा धनादेश 'कोएसो'चे नवीन संचालक सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
स्व.अॅड.दत्ता पाटील यांना आदरांजली
कोकण एज्युकेशन सोयायटीच्या मुख्यालयात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात प्रथम कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय पाटील यांनी स्व.अॅड.दत्ता पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व आदरांजली वाहिली. यावेळी कोकण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह अजित शाह, जनता शिक्षण मंडळाच्या संचालक शारदा धुळप, कोएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, कोएसो माध्यमिक शाळा प्रशासन अधिकारी कृष्णा म्हात्रे व अशोक गावडे, कोएसो प्राथमिक शाळा प्रशासन अधिकारी संजिवनी जोशी, कोएसो ईंग्रजी माध्यम शाळा प्रशासन अधिकारी अनिता पाटील व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शाळेला मुलभूत व भौतिक सुविधा विकास निधी
आयुष्यभर ग्रामीण विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी अथक परिश्रम घेणारे माझे पिता आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.अॅड.दत्ता पाटील अर्थात दादा यांनी, कोकणात व ग्रामीण भागात शैक्षणिक विकासाचे वास्तवात उतरवलेले स्वप्न, भविष्यात देखील ते अबाधित राखून त्याच मार्गावरुन पुढे जाताना पितृऋण उतराई होण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, दादांच्या वाढदिवसानिमित्त मी सन 2012 या वर्षापासून कोकण एज्युकेशन सोसायटीला एका शाळेला मुलभूत, भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी रु 1 लाख 1 हजार रुपयांचा निधी माझ्या स्वकष्टार्जीत उत्पन्नातून देण्याचा संकल्प सुरु केला आहे. मी जिवंत असेपर्यंत माझा हा संकल्प मी अबाधित ठेवणार असल्याची भूमिका स्व.अॅड.दत्ता पाटील यांचे चिरंजीव आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली.
संजय पाटील यांच्या संकल्पानुसार भौतिक सुविधा विकास निधीचे यंदाचे सहावे वर्ष आहे. सन 2012 मध्ये कोएसो मांडला माध्यमिक शाळा (महाड), सन 2013 मध्ये कोएसो प्रभाकर पाटील मा.शाळा, काळसूरी (म्हसळा), सन 2014 मध्ये कोएसो गुरुदत्त माध्यमिक विद्यालय,वाकी (महाड), सन 2015 मध्ये कोएसो नारायण गायकर मा.शा.,वळके (मुरुड), सन 2016 मध्ये को.ए.सो. माध्यमिक शाळा, माणकुले (अलिबाग) तर यंदा या संकल्पांतर्गत को.ए.सो.धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा,परहूरपाडा(अलिबाग) या शाळेस रु. 1 लाख 1 हजाराचा निधी देण्यात आला आहे.