इंजिनियरिंगचे स्वप्न पूर्ण करायला वडिलांसह गेला अन्...
By admin | Published: August 4, 2016 01:15 AM2016-08-04T01:15:56+5:302016-08-04T01:20:39+5:30
मुलाने बारावीचे शिक्षण सावर्डेतील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले
सावर्डे : महाड येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या एका एस. टी.चे चालक सावर्डे येथील श्रीकांत शामराव कांबळे (५५) हे होते. सोबत त्यांचा मुलगा महेंद्र श्रीकांत कांबळे (१९) होता. मुलगा आपल्या वडिलांसोबत बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी मुंबई येथील माटुंगा व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी निघाला होता.मूळचे मिणचेसावर्डे (ता. हातकणंगले) येथील कांबळे कुटुंबीय काही वर्षांपूर्वी आपल्या सरकारी नोकरीनिमित्ताने चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीसलाईन येथे स्थायिक झाले होते. ते मूळचे कोल्हापूर, तालुका हातकणंगलेमधील मीनसे सावर्डेचे रहिवासी होते. मुलाने बारावीचे शिक्षण सावर्डेतील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. चालक श्रीकांत शामराव कांबळे हे पत्नी सावित्री श्रीकांत कांबळे व दोन मुलांसह सावर्डे येथे राहात होते. मीलन कांबळे (२२) हा रत्नागिरीमध्ये फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून सध्या नोकरीच्या शोधात होता. लहान मुलगा महेंद्र याने बारावीपर्यंतचे शिक्षण सावर्डे महाविद्यालयात पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्याने सावर्डे येथून काही दिवसांपूर्वी आॅनलाईन प्रवेशाद्वारे मुंबई - माटुंगा येथील व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालय निवडले होते. याच प्रवेश प्रकियेची फेरी बुधवारी होती.
वडील चिपळूण बसस्थानकात चालक म्हणून कार्यरत होते. बोरिवली - चिपळूण या गाडीवर बहुतांशवेळा ते सेवेत असायचे. मंगळवारी राजापूर - बोरिवली गाडीवर चालक म्हणून चिपळूण आगारातून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांचा मुलगा त्याच गाडीतून प्रवास करीत होता, ते चालक म्हणून होते तर मुलगा त्यांच्या शेजारीच बसून प्रवास करीत होता. महाड येथील सावित्री नदीवरील दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या बससोबत तोही बेपत्ता झाला आहे. (वार्ताहर)