आविष्कार देसाई /अलिबागजिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी त्या-त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे उतावीळ झाले आहेत. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास ते दुसऱ्या पक्षात जाऊन दगाफटका करण्याची भीती असल्याने अद्यापही कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. ३०, ३१ जानेवारीला शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख जवळ येत आहे, तसे राजकीय रणांगण तापायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे इनकमिंग, आऊटगोर्इंग सुरू झाले आहे. सध्या शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे काम विरोधातील शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा यांना करावे लागणार आहे. त्या दिशेने शिवसेनेने कामाला सुरुवात केल्याचे दिसून येते. शिवसेनेत प्रवेश करण्याचा कल सध्या रायगडच्या राजकारणात दिसून येत आहे. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी त्यांचा पुत्र वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद कवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत फारकत घेतली. २८ जानेवारीला ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दिवशी ते अन्य मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे कळते.२१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पार पडणार आहे. त्या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावे, अशी बहुतेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची अपेक्षा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे सर्वांनीच उमेदवारी मिळण्याबाबत तगादा लावला आहे. पक्षश्रेष्ठींना थेट उमेदवारीबाबत बोलता येत नसल्याने पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळवू, अशा राजकीय वावड्या हस्तकांमार्फत उठविल्या जात आहेत. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गटाला आपल्या पक्षात घेऊन त्याला कन्फर्म तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केल्याचेही बोलले जात आहे. आधीच उमेदवारी जाहीर केली, तर इच्छुक उमेदवारांची नाराजी ओढावून घेण्याची धास्ती कोणत्याही पक्षाला लागणे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तोंडावरच थेट उमेदवारी जाहीर करण्याचा कल शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असावा, असे वाटते. कारण ३०, ३१ जानेवारीला त्यांच्या आघाडीचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.काँग्रेस आणि शिवसेनेने अलिबाग, पेण तालुक्यात आघाडी केली आहे. अलिबाग तालुक्यातील सातपैकी चार मतदार संघात काँग्रेस, तर तीन मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पैकी थळ मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तर चौल मतदार संघातून शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे आणि मापगाव मतदार संघातून काँग्रेसचे राजा ठाकूर निवडणूक लढणार असल्याचे पक्के झाले आहे. दुसरीकडे शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसने मापगावमधून दिलीप भोईर ऊर्फ छोटम यांना तर, चौल मतदार संघातून नंदू मयेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.या सर्व राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास इच्छुक उमेदवारांना गाफील ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचे अधोरेखित होते. इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाला, उमेदवारी अर्ज दाखल करण्याला योग्य वेळ मिळू न देणे, प्रचाराला जादा वेळ न देणे असे अडथळे निर्माण करुन त्यांचे खच्चीकरण करण्याची सोयच त्यांनी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे इच्छुकांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.दरम्यान, इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची मनाशी खुणगाठ बांधली असेल तर, त्यांना रोखणे कोणत्याही पक्षाला कठीण जाणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.
इच्छुकांकडून दगाफटक्याची भीती
By admin | Published: January 28, 2017 2:58 AM