भीतीपोटी केले होते पलायन
By admin | Published: October 9, 2015 11:52 PM2015-10-09T23:52:36+5:302015-10-09T23:52:36+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा नवीन वसाहत येथील योगेश कांबळे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण न झाल्याने शाळेत न जाता बाहेर फिरत बसला.
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा नवीन वसाहत येथील योगेश कांबळे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण न झाल्याने शाळेत न जाता बाहेर फिरत बसला. त्यातच त्याचे दप्तर शाळेचे मुख्याध्यापक सताप्पा कांबळे यांनी जप्त करून त्याची माहिती त्याच्या वडिलांना दिल्याने तो विद्यार्थी घरी न जाता बाहेर पळून गेला होता. मात्र गुरु वारी दुपारी त्याने आपल्या आईला फोन करून आपण नागोठणे रेल्वे स्टेशनजवळ थांबलो असल्याचे सांगितले.
याची तत्काळ दखल घेत महाड एमआयडीसी पोलिसांनी गं.द. आंबेकर हायस्कूल बिरवाडीचा विद्यार्थी योगेश कांबळे याच्याबाबत तत्काळ नागोठणे पोलिसांना माहिती देवून त्याला नागोठणे रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतले. दुपारी २ वाजता नागोठणेवरून त्याला महाड एमआयडीसीमध्ये आणण्यात आले. त्यावेळी योगेश कांबळे याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तो नियमितपणे गं.द. आंबेकर हायस्कूल बिरवाडी या शाळेमध्ये गेला होता. मात्र शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण न झाल्याने शिक्षक ओरडतील या भीतीने तो वर्गामध्ये बसला नाही. त्याने आपले दप्तर व सायकल शाळेजवळील एका चाळीच्या कोणीही राहत नसलेल्या खोलीमध्ये ठेवले होते. ते दप्तर मुख्याध्यापक सताप्पा कांबळे यांनी जप्त करून योगेश कांबळे या विद्यार्थ्याच्या वडिलांना भ्रमणध्वनीवर तुमचा मुलगा शाळेतून पळून गेला आहे, अशी माहिती दिल्याची खबर योगेशला मित्रामार्फत मिळाल्याने त्याने एमआयडीसीतून पलायन केले. (वार्ताहर)
शिक्षक व वडिलांच्या भीतीने केले पलायन
वीर रेल्वे स्टेशनवरून दादर-मडगाव रेल्वेने मडगाव गाठले. तेथून वास्कोला व वास्कोवरून पुन्हा मडगाव रेल्वे स्थानकावरून नागोठणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. प्रवासादरम्यान त्याला झोप लागल्याने नागोठणे रेल्वे स्थानकात तो उतरला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे वृत्त वाचल्यानंतर आपल्या आईला फोन करून मी नागोठणे रेल्वे स्थानकावर असल्याचे सांगितले.