मुंबई-गोवा मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:34 AM2020-05-24T00:34:24+5:302020-05-24T06:34:37+5:30
पर्यायी मार्गावर पाणी तुंबण्याची शक्यता
- सिकंदर अनवारे
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे विविध कारणास्तव सातत्याने ठप्प होत आहे. यंदादेखील कामाला अडथळा निर्माण झाला असून ऐन पावसाळ्यात हा मार्ग दरडी आणि पाणी तुंबल्याने ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे कामदेखील २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन सरकारने दिले होते. मात्र, अद्याप काम सुरूच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाउन झाल्याने कामे ठप्प होती.
महाडजवळ सुरू असलेले नांगलवाडी आणि केंबुर्ली गावाजवळील डोंगर फोडण्याचे कामदेखील थांबले. नांगलवाडी गावाजवळ नदीतून पर्यायी मार्ग काढण्यात आला. मात्र, लॉकडाउनमुळे या मार्गाचा वापर थांबला होता. तर केंबुर्ली गावाजवळ डोंगर फोडण्याचे कामही अपूर्णच आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात नांगलवाडी गावाजवळ तयार केलेल्या पर्यायी मार्गावर दरड आणि नदीतील पाणी येण्याची शक्यता आहे. तर केंबुर्लीजवळही दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इंदापूर ते पोलादपूरदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यालगत माती ठेवण्यात आली, शिवाय चौपदरीकरणातील भराव रस्त्यावर पडला आहे. यामुळे पाणी आणि चिखलही साचण्याची शक्यता आहे. नुकत्याच पडलेल्या अवेळी पावसामुळे जागोजागी पाणी साचले होते. सध्या काही ठिकाणी महामार्गावर कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, पाऊस तोंडावर असल्याने ही कामे पूर्ण होणे कठीण आहे. कोरोनाच्या भीतीमुळे परिसरातील अनेक मजूर गावी निघून गेल्याने काम रखडण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कामे सुरू केली आहेत, शिवाय पावसाळ्यात अडचण होणार नाही, यासाठी काळजी घेतली जात आहे.
- अमोल महाडकर, प्रभारी अधिकारी, महामार्ग
नांगलवाडीजवळ जुना मार्ग मोकळा केला जाईल. यामुळे पर्यायी मार्ग पाण्याखाली गेला तरी अडचण निर्माण होणार नसल्याचे या वेळी महामार्गाच्या काम करणाºया एल अॅण्ड टी कंपनीचे प्रकल्प अधिकारी नायडू यांनी सांगितले.