खाकीचा धाक, गतवर्षी ८७ टक्के गुन्ह्यांची उकल
By निखिल म्हात्रे | Published: January 2, 2024 07:35 PM2024-01-02T19:35:55+5:302024-01-02T19:36:17+5:30
गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलीस दल कोकण परिक्षेत्रात सर्वोत्तम आहे.
अलिबाग - रायगड पोलीस गुन्हेगारांवर वचक आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. रायगड जिल्ह्यात २०२३ मध्ये २ हजार ७१५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ३६६ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. म्हणजेच वर्षभरात दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी ८७ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दल यशस्वी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्हे उकल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्याची संख्याही वाढली आहे. महिला विषयक गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायलायात दाखल करण्यात आले असल्याने रायगड पोलीस दल राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. गुन्हे शाबिती प्रमाण ६८.८७ टक्के असून राज्यात रायगड पोलीस दल पहिल्या पाचात आहे.
रायगड पोलीस दलाच्या वार्षिक कामगिरीची महिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यावेळी उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०२२ मध्ये २ हजार ५८५ गुन्हे घडले होते. यापैकी २ हजार २४९ गुन्हे उघडकीस आले असून सरासरी८७ टक्के गुन्ह्याची उकल करण्यात यश आले होते. २०२३ मध्ये ४६६ अधिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण मात्र जास्त आहे. २०२३ सालात ८७ टक्के गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलीस दल कोकण परिक्षेत्रात सर्वोत्तम आहे.
जिल्ह्यात २०२३ मध्ये २६ खुनाचे गुन्हे नोंदवीले गेले त्यापैकी ३५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. मांडवा आणि रोही येथील जुन्या खुन प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. कारण दोन प्रकरणात ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्याची ओळख पटलेली नाही. खुनाचा प्रयत्न करण्याचे २९ गुन्हे घडले ते सगळे उघडकीस आले. मालमत्ता विषयक ६९४ गुन्हे वर्षभरात दाखल झाले यातील ४५४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले. मारहाणीच्या सर्व ३८३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असल्याचे यावेळी पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केले.
प्रतिबंधक कारवाई
रायगड पोलीस प्रशासनाने ३ गुन्हेगारी टोळ्याना आणि ६ व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. एम पी डी ए नुसार एका इसमास एक वर्षकरिता स्थानबद्ध केले आहे. १ गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ७ हजार ९३५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अवैध धंद्यांवरही कारवाई -
जिल्ह्यात अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये दारूबंदी ६१५, जुगार, मटका १९३, अमली पदार्थ १८, अवैध अग्नी शस्त्रे १५ गुन्हे दाखल केले आहेत. सन २०२२ मध्ये २२० ठिकाणी जुगार धंद्यावर छापा टाकून १ कोटी ११ लाख ४३ हजार ३२३ रुपये तर ७२६ दारूबंदीची कारवाई करून ६७ लाख १६ हजार ५७३ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महिला विषयक गुन्ह्यात ९८.२८ टक्के उकल
रायगड जिल्ह्यात महिला अत्याचाराचे एकूण २३३ गुन्हे दाखल झाले होते. यापैकी २२९ गुन्हे उघडकीस आणले असे आहेत. महिला विषयक दाखल झालेल्या सर्व गुन्ह्याचे ६० दिवसात दोषारोपपत्र न्यायलायत दाखल करण्यात आले असून त्याचे प्रमाण १०० टक्के आहे.
गुन्ह्यांची उकल करण्यावर आम्ही भर देत आहोत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच बरोबर गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे.
- सोमनाथ घार्गे , पोलीस अधिक्षक रायगड