वेगळीच व्यथा! ४ हजार टन कांदा सडण्याची भीती; २०० कंटेनर बंदराजवळच ‘जाम’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 07:03 AM2023-08-22T07:03:04+5:302023-08-22T07:03:24+5:30
निर्यात शुल्कवाढीनंतर सीमाशुल्क विभागाने ठेवले अडवून
मधुकर ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : केंद्र सरकारनेकांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदराबाहेर विविध कंटेनर यार्डमध्ये सुमारे २०० कंटेनर सीमाशुल्क विभागाने अडवून ठेवले आहेत. त्यामुळे मलेशिया, श्रीलंका, दुबई या देशांत पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याची भीती आहे.
कांदा बंदरात अडकल्याने व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदार राहुल पवार यांनी दिली. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क शून्यावरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. मात्र, अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत. शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए (जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण) बंदरातच कांद्याचे सुमारे ६० - ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते. मात्र, सीमाशुल्क विभागाने कंटेनर रोखून धरले आहेत. तसेच कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर प्रतीक्षेत उभे आहेत.
निर्यातदार संकटात
केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेकडो निर्यातदार आर्थिक संकटात सापडल्याचे निर्यातदार इरफान मेनन यांनी सांगितले.