पालकांना धास्ती, विद्यार्थी गैरहजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:54 AM2020-11-24T00:54:31+5:302020-11-24T00:54:57+5:30
शाळा सुरू. मात्र विद्यार्थीसंख्या कमी; अटी-शर्तींस पालकांचा नकार
मोहोपाडा : राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शाळा सोमवारी सुरू झाल्या. मात्र विद्यार्थीसंख्या कमी आहे. पालक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. मात्र, रिलायन्स फाउंडेशनची धीरूभाई अंबानी, सेंट जोसेफ, प्रिया, पिल्ले या शाळा बंद असून त्यांच्या अटी-शर्तींस पालकांचा नकार आहे.
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत जरी निर्देश दिले असले तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत असे आजचे चित्र होते. खालापूर तालुक्यातील ४७ शाळांपैकी जेमतेम १० शाळा सुरू झाल्या असून १६२ विद्यार्थी हजर होते. त्यांनाही लवकर सोडण्यात आले. ज्या खासगी शाळा आहेत, त्यांच्या व्यवस्थापणाने घातलेल्या अटी व शर्तींस पालकांनी मान्यता न दिल्याने शाळेचे गेट बंद आहेत. विद्यार्थ्यांची सर्वच जबाबदारी पालकांनी घेऊन शाळेत आणण्यापासून ते घरी जाईपर्यंत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे ही अट आहे. त्यामुळेच ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, अशी मागणी पालकांची आहे.
पालकांकडून अद्यापही शाळेला संमतीपत्रे नाहीत
चौक येथील सरनोबत नेताजी पालकर व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या ६०० पैकी ८५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले येथे ७ व विद्यामंदिर सारंग येथे १८ विद्यार्थी हजर होते. यांच्या पालकांकडून अद्यापही शाळेला संमती मिळाली नाही, तर संमती पत्र नसल्याने विद्यार्थ्यांना परत पाठविले आहे.
वरील तिन्ही शाळेंतील शिक्षक व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात एक शिक्षक पॉझिटिव्ह व दोन शिक्षक यांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले नाहीत. तिन्ही शाळांनी शाळा व परिसर स्वच्छ ठेवला असून सॅनिटाईज करण्यात आले आहे. ऑक्सिमीटर व थर्मल मशीनद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.