वाघाच्या दर्शनाने दांडगुरी परिसरात भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:29 AM2021-05-08T00:29:43+5:302021-05-08T00:30:14+5:30
वनविभाग घटनास्थळी; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्री परिसरातील झुडपांमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. वनविभागाला कळवताच तात्काळ घटनास्थळी त्यांनी भेट दिली. तसेच वाघसदृश प्राणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वाघाने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारे गाव. थंड वातावरण असलेला परिसर म्हणून याठिकाणाला ऐतिहासिक प्रसिद्धी आहे. विशेष म्हणजे वाघ दिसल्याचे कळल्यापासून परिसरात आणखी दहशत निर्माण झाल्याने कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दांडगुरी, वाकलघर, आसुफ तसेच बोर्ला भागात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. याभागात नदी देखील वाहत आहे. त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समजते. कोरोनाच्या दहशतीत आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे नागरिक घाबरलेल्या स्थितीत आहेत. रात्री १० च्या सुमारास दांडगुरी परिसरात वाघ दिसल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांना देण्यात आली. लागलीच बोर्ली राऊंड पथकाचे बुरान शेख, प्रतीक गजेवार, एल. एम. गिराने यांनी घटनास्थळी भेट दिली व संशयित प्राण्याचे ठसे घेऊन वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
आम्ही घटनास्थळी गेलो असता, संशयित प्राण्याचे ठसे उमटले होते. तपासासाठी ठसे पुढे पाठवले आहेत. नागरिकांनी जागरूक राहावे. जनावरांना आपल्या गोठ्यात बांधून ठेवावे. या घटनेमुळे वनविभाग सतर्क राहील.
- मिलिंद राऊत,
वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन
गुरुवारी रात्रीच्यावेळी बाईकस्वाराने वाघ दिल्याचे सांगितले. आम्ही ताळत्का तिकडे गेलो असता, वाघ पळून गेल्याचे निदर्शनास आले, मात्र काळोख असल्याने पुढे गेलो नाही. तात्काळ वनविभागाला कळविले व अधिकाऱ्यांनीदेखील भेट दिली.
- ग्रामस्थ, दांडगुरी