कर्जतमध्ये पर्यटकांना शोधण्यास मदत करणा-या ‘त्या’ चौघांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:12 AM2017-08-20T03:12:14+5:302017-08-20T03:12:14+5:30
कर्जत रेल्वेस्थानकापासून १४ किलोमीटर अंतरावर कोंढाणे गाव आहे. या ठिकाणी प्राचीन बुद्ध लेणी आहेत. या लेणीच्या जंगलात १५ आॅगस्टच्या रात्री मुंबई येथून फिरायला आलेले चार पर्यटक भरकटले होते.
कर्जत : कर्जत रेल्वेस्थानकापासून १४ किलोमीटर अंतरावर कोंढाणे गाव आहे. या ठिकाणी प्राचीन बुद्ध लेणी आहेत. या लेणीच्या जंगलात १५ आॅगस्टच्या रात्री मुंबई येथून फिरायला आलेले चार पर्यटक भरकटले होते. त्यांना शोधण्यास स्थानिक आदिवासींच्या मदतीने कर्जत पोलिसांना यश आले होते. त्यांना शेधणाºया चार देवदूतांचा कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुंबई बोरीवली येथील स्वप्निल मगदूम, मिशवल शालीयन, ज्योती पाळसमकर आणि जुलिया डीसोझा हे चार जण १५ आॅगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील कोंढाणे लेणीवर फिरायला आले. मात्र, त्यांना परतायला उशीर झाला आणि ते रात्री जंगलात भरकटले. त्यांनी रात्री कर्जत पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला. कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून तेथील अधिवासी बांधवांच्या मदतीने या चार पर्यटकांचा शोध घेऊन त्यांना पहाटे सुखरूप कर्जतला आणले.
पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, सहायक पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी कोंढाणे गावात जाऊन पोलीस पाटील रवींद्र गायकवाड, उंबरवाडीतील आदिवासी इरू जानू मेंघाळ, मधुकर हिरू पिरकट, वाळकू कमलू निरगुडा या चार देवदूतांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी सुजाता तानवडे यांनी चौघा देवदूतांना प्रत्येकी पाचशे रु पये बक्षीस दिले.