अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूनी लोखंडाच्या पाइपचे कुंपण घालण्यात आले आहे; परंतु त्यावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे हे कुंपण वाहनचालकाला दिसतच नाही. देखभाल दुरुस्तीसाठी रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या एजन्सीकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा वाहनधारकांचा आरोप आहे. या प्रकारामुळे अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे तातडीने वाढलेल्या गवताची छाटणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग २००२ साली बांधण्यात आला. ९४.५ कि.मी. लांबीच्या या महामार्गावर कोणताही अडथळा अथवा सिग्नल यंत्रणा नाही. तीन तासांच्या कालावधीत हे अंतर कापण्याच्या दृष्टिकोनातून हा मार्ग तयार करण्यात आला आहे. येथील वेगमर्यादा प्रतितास ८० किलोमीटर इतकी आहे. देशातील सर्वात सुरक्षित महामार्ग म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेकडे पाहिले जाते.या वरून खासगी व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, अवजड वाहने, तसेच चारचाकी धावतात. या ठिकाणी सूचना फलक, वळण दिशादर्शक, अपघात प्रवण क्षेत्र, पांढऱ्या रंगाचे पट्टे, बोगद्यामध्ये विजेची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर आतमध्ये जनावरे येऊ नयेत, महामार्गावरून धोकादायक क्रॉसिंग आजूबाजूच्या गावकऱ्यांनी करू नये, तसेच दोन्ही बाजूने येणाºया-जाणाºया वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जीआयच्या पाइपद्वारे कंपाउंड घालण्यात आले आहे. पूर्वी असलेले तारेचे कुंपण तुटल्याने बहुतांश ठिकाणी अशाप्रकारे लोखंडी पाइपचे कंपाउंड द्रुतगती महामार्गाच्या कडेला करण्यात आले आहे. मात्र, दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. काही ठिकाणी हे गवत डोक्याच्या वर गेले आहे. वळणाच्या ठिकाणी वाहनचालकांना यामुळे काही समजत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
महामार्गाची देखभाल आयआरबीकडे सोपवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी आयआरबीची मुदत संपल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील टोलवसुलीकरिता सहकार ग्लोबल एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. तर महामार्गाच्या देखभालीचे काम रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. पाच महिन्यांकरिता नेमण्यात आलेल्या या कंपनीकडून नियमित आणि वेळेवर देखभाल होत नसल्याच्या तक्र ारी येत आहेत.महामार्गालगत असलेले तारेचे कुंपण गंजल्यामुळे काही ठिकाणी तुटले आहे, ही वस्तुस्थिती आहे. तारेच्या कुंपण दुरुस्तीचे लवकरच काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच वाढलेले जंगली गवतही कापून साफसफाई करण्यात येईल, खड्डे बुजवणे या कामाकरिता नवीन निविदा काढण्यात आली आहे. लवकरच कामाला सुरुवात केली जाईल.- राकेश सोनवणे,कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ