फेरी बोट, मच्छीमारांनी आपापसात सामंजस्य राखावे- सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:16 PM2020-09-08T23:16:27+5:302020-09-08T23:16:53+5:30
खासदारांनी आगरदांडा जेट्टीची पाहणी करून केली चर्चा
आगरदांडा : आगरदांडा जेट्टी येथे काही काळापुरती मच्छीमारांना मासळी उतरवण्याची व विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती, परंतु प्रवासी वाहतुकीला या मधून अनेक अडचणी निर्माण झाल्या व फेरी बोटमधील प्रवाशांनी समस्या निर्माण झाल्याने असंतोष वाढू लागला होता. यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी आगरदांडा जेट्टीला भेट देऊन फेरी बोट चालक व मच्छीमार बांधवांशी चर्चा करून दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन वाद न वाढवता आपापसात चर्चा करावी, असे सांगितले.
ज्यावेळी फेरी बोटीमधील प्रवासी उतरवायचे असतील, त्यावेळी मच्छीमार बोटींनी त्यांना रस्ता दिला पाहिजे. बोटीमधील प्रवाशांनी खोळंबून राहता कामा नये. मच्छीमारांनी सुरुवातीच्या मीटिंगमध्ये सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंतची जी वेळ दिली होती, त्याप्रमाणे आपला कारभार कसा आटोपता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, फेरी बोट येईल, त्यावेळी जेट्टीवर बोट असता कामा नये, यासाठी दोन्ही संघटनांसोबत चर्चा करून तोडगा काढा व वाद होणार नाही, असे पाहा असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी आगरदांडा भेटीत केले आहे.
यावेळी आगरदांडा जेट्टी येथे माजी उपनगराध्यक्ष अतिक खतीब मुरुड तालुका नाखवा संघाचे समन्वयक प्रकाश सरपाटील, सागर कन्या मच्छीमार संघाचे अध्यक्ष मनोहर बैले, उपाध्यक्ष मनोहर मकु, जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन महेंद्र गार्डी, चेरमन विजय गिदी, लहू रावजी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सी.जे.लवंडे, सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुरेश भारती, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गमन गावीत, चेरमन पांडुरंग आगरकर, माजी नगरसेवक संजय गुंजाळ, गटविकास अधिकारी संजय चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अनंत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन विजय गिदी यांनी किमान एक महिना तरी आम्हाला आगरदांडा जेट्टी वापरास मिळावी, यासाठी सहकार्य मिळावे, अशी विनंती केली.खासदार सुनील तटकरे यांनी फेरी बोट मालक व मच्छीमार यांनी संयुक्तिक सभा घेऊन आपापसात तोडगा काढावा व मतभेद होणार नाहीत, मच्छीमारांचा त्रास फेरी बोटीला होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तातडीने मेरिटाइम बोर्ड व मत्स्यविकास अधिकारी या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येऊन वाद मिटविण्यात आला आहे.
डिझेल परतावा मिळण्याची मागणी
१. आगरदांडा येथे तात्पुरत्या स्वरूपात मच्छीमारांना होड्या थांबण्याची परवानगी मिळण्यासाठी एम.एम. बीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, रामास्वामी यांच्यासोबत चर्चा करून पत्र मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी खा. तटकरे यांनी दिले आहे. उपाध्यक्ष मनोहर मकु यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मच्छीमार संस्थांना डिझेल परतावा मिळाला नाही, यासाठी मदत करण्याची विनंती केली.
२. यावर सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुरेश भारती यांनी ७२ कोटींचा प्रस्ताव रायगड जिल्ह्यामार्फत पाठवला असल्याची माहिती दिली. यावर सुनील तटकरे यांनी पैसे टप्प्याटप्प्याने मिळवून देण्याचे आश्वासन दिले.