पोलादपूर : महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटातील रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून सडलेला भाजीपाला टाकण्यात येत आहे. याबाबत पर्यटकांसह स्थानिकांमध्ये नाराजी आहे. हा घाट कोकणातील भाजी व्यापाऱ्यांसाठी डंपिंग ग्राऊंड बनला असून या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आंबेनळी घाटात सडलेला भाजीपाला सातत्याने टाकण्यात येत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. यापूर्वी असाच प्रकार घडल्यानंतर त्याची दखल घेऊन हरोशी ग्रामपंचायत व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण आंबेनळी घाट स्वच्छ केला होता. त्यानंतर काही महिने घाटात सडलेला भाजीपाला व कचरा टाकण्याचे बंद झाले होते. पण, आता पुन्हा घाटात जागोजागी कचरा व सडलेला भाजीपाला दिसत आहे.
कोकणात प्रामुख्याने वाई मंडईतून दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात व्यापारी भाजी खरेदी करतात. भाजी मंडई सकाळी लवकर भरत असल्यामुळे सर्व वाहने मध्यरात्रीच घाटातून प्रवास करतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन दुकानामधील विक्री करून उरलेला व सडलेला भाजीपाला, तसेच गोळा होणारा सर्व कचरा आंबेनळी घाटात टाकला जातो.
रान कडसरी व कपडे खुर्द व देवळे ग्रामपंचायत हद्दीतील दाभिल टोकनजिक पोलादपूर- महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटातील प्रत्येक वळणावर सडलेल्या भाजीपाल्यांचे ढीगच्या ढीग दिसत असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. प्रतापगडावर जाणारे हजारो पर्यटक याच मार्गावरून जातात, मात्र कुजलेल्या भाजीपाल्यामुळे येणाºया उग्र दर्पामुळे ते हैराण होतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही उद्भवत आहे. सडलेली भाजी माकडे, अन्य वन्यजीवही खात असल्याने त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यालगत भाजीपाला टाकणाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणीमित्र संघटनेकडून होत आहे.
अनेकदा रात्री सडलेला भाजीपाला घाटात टाकणाºयांचे वाहन स्थानिकांनी पोलिसांना पकडून दिले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना सोडून दिले जात असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सदर भाजीविक्रेते स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा वाजवत असल्याने प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.