कर्जत येथील बाजारपेठेला फेरीवाल्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 11:45 PM2020-03-08T23:45:43+5:302020-03-08T23:45:49+5:30
टोइंग व्हॅन बंद : पाच वेळा निविदा काढूनही प्रतिसाद नाही
कर्जत : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुंद केलेले रस्ते कुणासाठी बांधलेत हासुद्धा एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला फेरीवाले व हातगाडीवाल्यांचा विळखा बसला आहे. वारेमाप रिक्षा परवाने देणे सुरू असल्याने रस्ते कमी आणि रिक्षा जास्त असे झाले आहे. त्यातच जागा असेल तेथे रिक्षा लावण्याची प्रवृत्ती या साऱ्या प्रकारामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसते. त्यातच सकाळच्या वेळी चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना तसेच प्रवाशांना गाड्या पकडण्यासाठी कसरत करावी लागते. मात्र रात्री बाजारपेठेतील रस्ता मोठा दिसतो आणि दिवस उजाडला की रस्ता भरगच्च असतो.
मध्यंतरी टोइंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्याप्रकारे सुटू लागला. कराराची मुदत संपली आणि टोइंग व्हॅन बंद करण्यात आली. नगरपरिषदेने पाच वेळा निविदा काढूनही कुणीच प्रतिसाद न दिल्याने कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.
कर्जतची वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी होऊन बसली आहे. पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी आल्यानंतर किंवा नगर परिषदेची सूत्रे नवीन मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर काही दिवस कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली राहते. मात्र, नंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती होऊन बसते. आता नवीन मुख्याधिकारी आले परंतु त्यात काहीच बदल झाला नाही. मध्यंतरी टोइंग व्हॅनची तांत्रिक अडचण सोडवून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या उपक्रमाचे स्वागत कर्जतकरांनी केले होते. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांनी सुस्कारा सोडला होता.
काही महिन्यांनी टोइंग व्हॅन बंद झाली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी याबाबत सरकारी पोर्टलद्वारे माहिती विचारल्यावर नवीन आलेले मुख्याधिकारी पंकज पवार - पाटील यांनी ‘पोलीस खात्याच्या सहकार्याने टोइंग व्हॅन ठेकेदाराची एक वर्षासाठी नियुक्ती केली होती. नेमणुकीची मुदत संपल्यानंतर ठेकेदाराने काम बंद केले. पाच वेळा निविदा काढूनसुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने टोइंग व्हॅन बंद करावी लागली आहे,’ असे लेखी कळवून या कामासाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध करून ठेकेदाराची नेमणुकीची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.