जयंत धुळप अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांत विविध ठिकाणचे धबधबे, ओढे, नद्या, तलाव या ठिकाणी पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगकरिता आलेल्या १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विशेषत: पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच माहितीच्या नसलेल्या पाण्याच्या जलाशय आणि धबधब्याच्या ठिकाणी जाताना स्थानिकांकडून माहिती न घेणे आणि अनेकदा स्थानिकांनी सांगून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे अपघाती मृत्यू झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या पर्यटक व युवकांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.पर्यटक आणि विशेषत: बुडून मृत्यू होण्याच्या या समस्येला आळा घालण्याकरिता प्रत्येकवेळी पोलिसांना वा सरकारी यंत्रणेला जबाबदार धरणे योग्य नाही. मुळात येणाºया पर्यटकांनी आत्मसंयम ठेवणे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेकरिता अत्यावश्यक आहे, असे मत या निमित्ताने ‘चला मुलांना घडवू या’ या बालक-पालक प्रबोधन उपक्रमाचे प्रणेते व ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. मुंबई-पुण्यातील महाविद्यालयातील अनेक मुले-मुली आपल्या पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रायगड किल्ला, रायगडमधील अन्य पर्यटन स्थळे आणि विशेषत: समुद्र किनारी येत असतात. अशा मुला-मुलींचे देखील अपघाती मृत्यू झाल्याचे अनेक प्रसंग आहेत. अशा वेळी दोष कुणाचा, त्या मुलांच्या पालकांचा, सरकारी यंत्रणेचा की पोलिसांचा असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु या तिघांपैकी दोष कुणाचाही नसतो, आयुष्याचे नुकसान मात्र त्यांचे स्वत:चेच होते. यातून स्वसुरक्षेचा विचार युवक-युवतींनी गांभीर्याने करणे अनिवार्य असल्याचेही डॉ.दाभाडकर यांनी नमूद केले. मद्यप्राशन करून समुद्रात पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू झाल्याचीही उदाहरणे जिल्ह्याच्या किनारपट्टीत घडली आहेत. या समस्येला आळा घालणे कायद्याने शक्य नाही. त्याकरिता आत्मसंयम आवश्यक आहे, तो पर्यटनाकरिता आलेल्या गटातील एकानेजरी विचारात घेतला तरी असे दुर्धर प्रसंग ओढावणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.पोलिसांना न जुमानता चालते मस्तीअलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी विशेष आणि मोबाइल पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करतात. अलिबाग, वरसोली आदि समुद्रकिनारी भरती ओहोटीच्या वेळा दर्शविणारे फलक देखील लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक पर्यटक समुद्रात ओहोटीच्या वेळी पोहण्याकरिता जातात आणि मग काही वेळेस दुर्घटना घडते. समुद्र किनाºयावरील स्थानिक नागरिक वा छोटे व्यावसायिक आवर्जून समुद्राच्या भरती-ओहोटीबाबत सूचना करतात, परंतु त्या नाकारून समुद्रात जाणाºया पर्यटकांना कसे आवरायचे असा प्रश्न तेथे कार्यरत पोलीस कर्मचाºयांना असतो, असे वराडे यांनी सांगितले. दोन दिवसांत कर्जत तालुक्यात वर्षासहलीसाठी येणाºया पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे तर महिन्याभरात कर्जत तालुक्यात धरण, धबधबा, आणि ट्रेकिं साठी येणाºया एकूण नऊ जणांचे बळी गेले आहे. धबधब्यावर, समुद्रकिनारी, धरणावर मौज, मज्जा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करु न ही तरु णाई सेल्फीच्या नादात अति उत्साहात जीव धोक्यात घालतात, यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.सुरक्षेकडे आणि प्रशासनाच्या सूचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करीत आहेत.
रायगडमध्ये पंधरवड्यात १२ पर्यटकांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:10 AM