निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - मुंबई - गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांना घेऊन निघालेल्या विविध प्रकारच्या वाहनांची अत्यंत वेगवान वर्दळ आहे. या वाहनांची नोंद पोलिसांच्या डायरीत केली जात आहे. एका तासाला सरासरी 350 वाहने मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणाकडे रवाना होत असल्याची माहिती अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
महामार्गावरुन गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. या नोंदी नुसार मागील दोन दिवसात पन्नास हजार गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. रविवारी सकाळी सहा वाजल्या पासून या सरासरी वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने कोकणात जात होत्या. जेवणाकरिता चाकरमानी महामार्गावर ठिकठिकाणी थांबल्यामुळे दुपारच्या वेळेत सरासरी वाहन प्रमाण काहीसे कमी होते. मात्र चार वाजल्या पासून या प्रमाणात वाढ झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून माणगाव जवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते, इंदापूर व माणगाव येथील बायपास मार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी ही नित्याचीच होणार आहे. यंदाचे वर्षी वाहतूक कोंडी होवू नये व गणेशभक्तांना आपल्या गणरायाच्या दर्शनाला वेळेत पोहोचता यावे, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्वाची खबरदारी घेतली होती.गेल्या दोन दिवसांत 2100 खासगी बसेसमधून चाकरमानी कोकणात रवाना झाले. बसेस व्यतीरिक्त खासगी कार, टेम्पो आदि सुमारे १ लाख ५५ हजार वाहने कोकणात रवाना झाली आहेत. दरम्यान पोलादपूर खेड दरम्यानच्या कशेडी बोगद्यातून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आल्याने येथील वाहतूक सुरळीत आणि वेगाने सुरु असल्याची माहीती अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.गणेशोत्सवाकरिता मुंबई, ठाणे, पालघर या प्रमुख जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आपल्या कोकणातील गावी निघाले होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील ६० पोलीस अधिकारी आणि ३३५ पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. या बरोबरच पालीफाटा (खोपोली) ते वाकण या महामार्गावर देखील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान शनिवार व रविवारी बंदी आदेश मोडणाऱ्या 365 अवजड वाहनांवर रायगड पोलीसांनी कारवाई करीत 2 लाख 43 हजार 650 रुपयांची दंड आकारला आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक.