नागोठणे : लोकशासन आंदोलन संघर्ष संघटनेच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी पाचव्या दिवशी चालूच आहे. स्थानिक आमदार रवींद्र पाटील यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री, तसेच एकही लोकप्रतिनिधी आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांसह कोणताही सरकारी अधिकारी पाचव्या दिवसांपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला नाही. मात्र, आंदोलनकर्त्यांचा उत्साह दररोज वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सोमवारी रात्री उरण आणि पनवेलचे सिडको विरोधातील ९५ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर यांच्यासह सुधाकर पाटील (उरण), पुंडलिक म्हात्रे, संतोष पवार, डीवायएफआयचे संदीप पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील आदींसह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. शांततेच्या मार्गाने शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत चालू असलेले रायगड जिल्ह्यातील हे पहिलेच आंदोलन असल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया या मंडळींनी दिली. हे आंदोलन सनदशीर मार्गाने चालू असून, नक्कीच यश मिळेल. काही अडचण आल्यास अर्ध्या रात्री मोठ्या संख्येने आम्ही धावून येऊ, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड, अध्यक्ष शशांक हिरे आदी उपस्थित होते.