पावणेसात हजार हेक्टर शेतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:54 PM2020-06-05T23:54:02+5:302020-06-05T23:54:15+5:30
रायगडमधील फळबागांचे मोठे नुकसान : ११ हजार ४३१ घरांची पडझड; पंचनामे करण्याचे काम सुरू
निखिल म्हात्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सहा हजार ७६६.२२ हेक्टर शेती व फळबाग लागवड क्षेत्राचे नुकसान झाले. अंदाजे ११ हजार ४३१ घरांची पडझड झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. तर गोठे व इतर पडझड झाल्याची माहिती घेत त्यांचे पंचनामे करण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे.
निसर्ग वादळाचे पर्व संपल्यानंतर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत सतत पाऊस पडत होता. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते साफ करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. जिल्हा प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनही रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करीत नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा कररून देत होते. आपत्ती व्यवस्थापन व पोलीस विभागामार्फत आपत्ती आलेल्या ठिकाणी, योग्यरीत्या कामकाज केल्याने जीवितहानी टळली; मात्र या आपत्तीत घरे व गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निसर्ग वादळात अलिबागमधील एक, माणगावमध्ये दोन तर श्रीवर्धनमध्ये एक अशा एकूण चौघा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३९ गुरे या वादळामुळे मृत्युमुखी पडली. जिल्ह्यातील टेलिफोन सेवा पूर्णत: खंडित झाली असून ती पूर्ववत करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तळा तालुक्यातील १०३ शाळा, ९३ अंगणवाड्या, १४ ग्रामपंचायत कार्यालये, एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर एका डॉक्टर निवासाचे नुकसान झाले आहे.
खालापूर तालुक्यात शाळा, २ शासकीय कार्यालये; माणगाव २ शाळा, २ शासकीय कार्यालये; महाड ४ शाळा, १ शासकीय गोदाम; श्रीवर्धन ३४० शासकीय कार्यालये; म्हसळा येथे २५० शाळा, १० मंदिरे तसेच १६ शासकीय कार्यालयांचे नुकसान झाले आहे. तर रायगड जिल्ह्यात १४ हजार ७०५ विद्युत खांब व तारा तुटल्या आहेत. सध्या विद्युत खांब व तारा जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहे.
एक लाख ९८ हजार ३५४ झाडे जमीनदोस्त
रायगड जिल्ह्यात अंदाजे एक लाख ९८ हजार ३५४ झाडे जमीनदोस्त झाली आहेत. झाडे पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने जिल्ह्यात मोठी वित्तहानी झाली आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने रस्त्यात पडलेली झाडे बाजूला करून गावांची कनेक्टिव्हिटी होण्यास मदत झाली आहे. तर ११ हजार ४३१ घरांची पडझड झाली असून ती दुरुस्त करण्याचे काम सध्या जिल्हाभरात जोरदार सुरू आहे. एकूण ३६४ शाळा, ३६० शासकीय कार्यालये, ९३ अंगणवाड्या, १० मंदिरे, १ शासकीय गोदाम, १४ ग्रामपंच्यात कार्यालये, एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर एक डॉक्टर निवास यांचे नुकसान झाले आहे.
थळ परिसराची मुख्यमंत्र्यांनी के ली पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी रायगड दौऱ्यावर आले होते. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा होता. अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या परिसराची पाहणी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी दुपारी १२ च्या सुमारास केली. अलिबाग थळ येथे झाडे, विजेचे पोल पडून अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून थळ परिसरात पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
नागोठणेत ५० लाखांचे नुकसान; पंचनाम्यासाठी ग्रामपंचायतीची मदत
नागोठणे : बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने नागोठणे शहरात ५० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी शहराच्या विविध भागांत फिरून नुकसानीची पाहणी केली असून नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंचनामे तलाठ्यांना एकाचवेळी करणे शक्य नसल्याने नुकसानीची प्राथमिक माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी कार्यरत करण्यात आले.