पेणच्या पाच गावांचा पाण्यासाठी लढा

By admin | Published: February 5, 2017 02:52 AM2017-02-05T02:52:02+5:302017-02-05T02:52:02+5:30

पेणमधील पाच गावांच्या ग्रामस्थांकडून आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण

The fight for the water of five villages of Pen | पेणच्या पाच गावांचा पाण्यासाठी लढा

पेणच्या पाच गावांचा पाण्यासाठी लढा

Next

नवी मुंबई : पेणमधील पाच गावांच्या ग्रामस्थांकडून आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. असे असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ, शनिवारी पाच गावांच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला आहे.
देश स्वातंत्र होऊन ६९ वर्षांचा कालावधी उलटला, तरीही अद्याप पेणमधील पाच गावांतील ग्रामस्थांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. या पाचही गावांमध्ये सुमारे नऊ हजार लोकवस्ती आहे. मात्र, पाण्याविना त्यांचे अतोनात हाल सुरू आहेत. पिण्यासाठी पाणीच नसल्यामुळे रात्री-अपरात्री दूरवरून हंडे भरून आणावे लागत आहेत, परंतु चालण्यासाठी चांगले रस्तेदेखील नसल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करताना, महिला, मुलांसह वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकदा पाणी विकत घेण्याचे वेळदेखील ग्रामस्थांवर येत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे. या गावांना हेटवणे धरणाचे पाणी मिळावेत, अशी ग्रामस्थांची पूर्वीपासून मागणी आहे. यासाठी त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडेदेखील पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग व रस्ते बांधकाम विभागांकडे कळविण्यात आले आहे.
त्यानंतरही पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषणदेखील केले होते, परंतु काही केल्या प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे, ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा मार्ग निवडला आहे. पाण्याचा प्रश्न न सुटल्यास, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर याचा इशारा प्रशासनाला देण्याकरिता शनिवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाचही गावांचे दहा हजारांहून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. या जमावाने लगतच्या प्रत्येक गावांत व पाड्यात जाऊन इतर ग्रामस्थांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर, पोलीस व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिल्याचे ग्रामस्थ नरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. तर जोपर्यंत पाचही गावांच्या पाण्याचा प्रश्न व इतर मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत ग्रामस्थ मंडळ मतदानावर बहिष्काराच्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The fight for the water of five villages of Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.