सगेसोयरे व्याख्येअंतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच: मनोज जरांगे पाटील
By वैभव गायकर | Published: February 7, 2024 07:28 PM2024-02-07T19:28:52+5:302024-02-07T19:28:59+5:30
मराठा महोत्सवाचे कामोठे याठिकाणी जरांगे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: सगेसोयरे या व्याख्येचे अंतर्गत मराठ्यांना, इतर मागासवर्गाचे आरक्षण मिळत नाय तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी दि.7 रोजी कामोठे येथे केले.मराठा समाजाची संघटना असलेल्या एम्पावर आणि कामोठा, कळंबोली, खारघर, तळोजा पनवेल, खांदा कॉलनी, करंजाडे आदी शहरांमधील सकल मराठा समाजाच्या संघटनेच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या मराठा महोत्सवाचे दि.7 रोजी कामोठे याठिकाणी जरांगे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
7 ते 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापर्यंत, मराठा समाजाच्या उद्योजकांचा मराठा महोत्सव कामोठे पोलीस ठाणे सामोरील ग्राउंड वर आयोजित करण्यात आलेला आहे.उद्घाटना निमित्त एम्पावर सामाजिक संघटनेच्या वतीने कुणबी मराठा समाजाच्या प्रतीक असलेला नांगर मनोज जरांगे यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पनवेल महानगरपालिका परिसरातील नवी मुंबई परिसरामधील हजारो मराठ्यांनी तसेच इतर समाजाच्या बांधवांनी मोर्चाच्या वेळेस, महाराष्ट्र मधून आलेल्या लाखो करोडो मराठा बांधवांना एकही भाकरी कमी पडू दिली नाही. जेवणाची उत्तम व्यवस्था केली.
याशिवाय जोपर्यंत सगेसोयरे या व्याख्येचे अंतर्गत मराठ्यांना, इतर मागासवर्गाचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या आंदोलन चालूच राहील याची ग्वाहीहि समाजाला यावेळी दिली.यावेळी माजी नगरसेविका लीना गरड, गणेश कडू, रायगड जिल्ह्याचे सकळ मराठा समाजाचे नेते विनोद साबळे , सेनेचे महानगर प्रमुख रामदासजी शेवाळे व इतर सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.