कर्जत तालुक्यातून १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल
By admin | Published: February 7, 2017 04:16 AM2017-02-07T04:16:30+5:302017-02-07T04:16:30+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत कर्जत तालुक्यातील १८ जागांसाठी एकूण १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या आघाडीने तसेच भारतीय जनता पार्टी आरपीआय युतीच्या, शिवसेना, काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे कर्जत तालुक्यात प्रथमच आॅल इंडिया मजलिसे इ इत्तेहादुल मुस्लिमीन (ए आय एम ई एल एम) पार्टीने शेलू गणातून पंचायत समितीसाठी आपल्या उमेदवाराचा अर्ज भरला आहे.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद प्रभागाचे सहा गट आहेत तर पंचायत समिती प्रभागाचे बारा गण आहे. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र भरावयाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी २१ तर पंचायत समिती गणासाठी ३६ असे ५७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद (गट) साठी ४० तर पंचायत समिती (गण) साठी ८४ अशी एकूण १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली.
सोमवारी रायगड जिल्हा परिषद विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे, सदस्य सुदाम पेमारे, माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे, तर पंचायत समितीचे माजी सभापती धोंडू राणे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (वार्ताहर)
भाजपा प्रथमच निवडणूक रिंगणात
माणगाव: तालुक्यात प्रथमच भाजपा पक्षाने तीन गटात व सहा गणात आपले उमेदवारी अर्ज ६ फेब्रुवारी रोजी दाखल केले आहेत. मात्र मोर्बा गट रिक्त ठेवला आहे. जिल्हा परिषद गोरेगाव गटासाठी एस.सी. महिला आरक्षण म्हणून भारती भालचंद्र महाले तर गोरेगाव गणासठी युवराज हरिभाऊ मुंढे व लोणेरे गणासाठी दीपक मेस्त्री यांनी अर्ज दाखल केले असून तळाशेत जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला हर्षदा खेकडे तर तळाशेत गणासाठी अनुसूचित जमाती महिला देवका मोरे व साई गणासठी गणेश भोनकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निजामपूर जिल्हा परिषद गटासाठी एस.टी.महिला हीरा वाघमारे तर निजामपूर गणासाठी उषा महेश कासार व पाटणूस गणात अर्चना कोदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. मोर्बा जिल्हा परिषद गट व गण रिक्त ठेवला आहे.