वावोशी : एक कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी बरखास्त केलेल्या सावरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह सात सदस्य, ग्रामसेवक गणेश किसन शिंदेवर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खालापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता असलेल्या सावरोली ग्रामपंचायतीत २०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी व इतर कामामध्ये सुमारे ९९ लाख ५९ हजारांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सावरोलीचे ग्रामस्थ अॅडव्होकेट संतोष बैलमारे यांनी १९ जानेवारी २०१७ साली खालापूरच्या पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याकडे केली होती. त्यानुसार चौकशी होऊन अहवाल रायगड उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे व पुढे नवी मुबईच्या कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. २ जानेवारी २०१८ला कोकण विभागीय आयुक्त यांचेकडे अंतिम सुनावणी होऊन मुंबई ग्रामपंचायत अधिनियम (१९६९ मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९(११)अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामसेवक गणेश किसन शिंदे यांना दोषी धरून ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश आयुक्तांनी दिला होता; परंतु या आदेशावर स्थगिती मिळवत बाजी मारली. या भ्रमात असणाºयांना मंगळवारी चांगलाच दणका बसला.भ्रष्टाचार प्रकरणी पंचायत समिती विस्तार अधिकारी मीनल जनार्दन कनोजे यांनी खालापूर पोलीसठाण्यात तक्रार दिल्यानंतर सरपंच सरिता मुकणे, जयश्री पाटील, प्रवीण गोविंद बैलमारे, संतोष नारायण घोसाळकर, तेजल बारड, वृषाली पाडगे, नरेंद्र लक्ष्मण तटकरे, ज्योती उद्देश पवार व उषा घोसाळकर, ग्रामसेवक गणेश किसन शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळताच काही सदस्य अज्ञातवासात गेले असून, पाच सदस्य पोलीस ठाण्यात हजर होते.
सावरोली ग्रामपंचायतीत भ्रष्ट्राचार प्रकरणी गुन्हा दाखल , एक कोटीचा भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:14 AM