अलिबाग :रायगड जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण दोन हजार ४७५ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. अलिबाग तालुक्यात चार ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून यासाठी १४० सदस्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. ही सर्वाधिक उमेदवारी संख्या आहे.
जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. सर्वाधिक (२४) ग्रामपंचायतींच्या निवडणुका पनवेल तालुक्यात होत आहेत. यातून २२८ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी ६९१ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. सर्वाधिक अर्ज सादर करण्याची सरासरी अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांमध्ये आहे.
अलिबागमध्ये एका जागेसाठी चारपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या २३ डिसेंबर या पहिल्या दिवशी केवळ तीन जणांनी पूर्ण भरलेले अर्ज सादर केले होते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी ऑफलाइन अर्ज करण्यास मुभा दिली होती. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात एक हजार ३५६ जणांनी एकाच दिवशी अर्ज भरले आहेत. त्यामुळे एकूण अर्जसंख्या दोन हजार ४७५ इतकी झाली आहे.