कालव्यांसाठी ड्रोन कॅमेऱ्यांनी चित्रीकरण
By admin | Published: June 13, 2017 02:59 AM2017-06-13T02:59:21+5:302017-06-13T02:59:21+5:30
तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. मात्र कालवे नसल्याने धरणाचे पाणी मागील एक दशक तसेच पडून आहे. धरणाचे पाणी शेतीसाठी देण्याकरिता आवश्यक असलेले कालवे बनविण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्यांच्या सीमा निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. कालव्यांचे सीमांकन करण्यासाठी कर्जत पाटबंधारे विभागाने त्या कामासाठी ड्रोन कॅमेरे वापरले.
कर्जत तालुक्यातील सावरगावपासून आंबिवली या रेल्वेपट्ट्यातील गावातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाची निर्मिती केली आहे. ५० कोटीहून अधिक खर्च करण्यात आलेल्या या धरणाचे पाणी परिसरातील २० गावांमधील १००० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यासाठी मुख्य कालवा तसेच उजवा आणि डावा असे १५ किलोमीटरचे कालवे निर्माण केले जाणार होते. पाटबंधारे खात्याच्या तत्कालीन अधिकारी वर्गाने केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे धरणाच्या जलाशयात पाणीसाठा होत असताना आवश्यक कालवे तयार करून घेतले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी २००३पासून जलाशयात पडून
आहेत.
दुसरीकडे कालव्याचे सीमांकन त्यावेळी पाटबंधारे खात्याने केले नसल्याने शेतकऱ्यांनी कालव्यांच्या मार्गात अन्य कामे करून कालवे रोखून धरले. त्याचवेळी कालव्यांसाठी लागणारी जमीन मिळावी म्हणून त्याचे अधिग्रहण देखील करण्यात आले नसल्याने शेतकरी विना मोबदला जमीन देण्यास विरोध करीत आहेत. त्याचा परिणाम कालवे निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाहीत आणि धरणाचे पाणी १००० हेक्टर जमिनीपर्यंत शेतीसाठी पोहचू शकले नाही.
जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालवे जाणाऱ्या मार्गातील जमिनी अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळणार म्हणून विकल्या आहेत.त्यामुळे कालव्यांच्या मार्गात मागील काळात अडथळे निर्माण झाले आहेत. परंतु कोट्यवधी रु पये खर्चून पाणी असेच पडून ठेवले जाणार नाही अशी भूमिका स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी घेतली आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्यांची कामे करण्याचे मनावर घेतले आहे. एकूण १५ किलोमीटर कालव्यांपैकी जेमतेम ५ किलोमीटरचे कालवे पाटबंधारे खात्याने खोदून घेतले आहेत. मात्र ते कालवे देखील अखंड नसल्याने धरणातील पाणी कालव्यात सोडता आले नाही.
कालवे करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी पाटबंधारे विभाग सरसावला आहे. त्यांनी कालव्याचे सीमांकन करण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणून त्यांच्या माध्यमातून सर्व भागातील कालव्याच्या सीमा निश्चित केल्या आहेत. आता पावसाळ्यानंतर कालव्यांच्या कामाला सुरु वात होण्याची शक्यता असून दरम्यानच्या चार महिन्यात पाटबंधारे विभाग जमीन अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही करणार आहे.
आमच्या भागातील शेतकरी २००३ पासून पाली-भूतीवली धरणात असलेले पाणी पाहत आहे. शेतीसाठी कधी पाणी येईल याची वाट शेतकरी अनेक वर्षे पाहत होता. त्यामुळे शेतात पाणी आणण्यासाठी आवश्यक असलेले कालवे तयार करण्यासाठी प्राथमिक पाऊल पाटबंधारे विभागाने उचलले असल्याने येथील शेतकरी आनंदी आहे. - किशोर गायकवाड, स्थानिक शेतकरी