लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उरण-पनवेल महामार्गालगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. विकासाच्या नावाखाली भूमाफियांनी खारफुटीचे वीस एकरच्या क्षेत्रावर मातीचा भराव टाकल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संस्थांनी केला आहे.
या संदर्भात पर्यावरणप्रेमी संस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार, संबंधित भूमाफियांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. उरण परिसरात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खारफुटींची तोड केली जात आहे. या विरोधात विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी लढा उभारला आहे. संबंधित विभागाकडून कारवाईची केवळ औपचारिकता केली जात आहे.
याचा परिणाम म्हणून खारफुटीवर मातीचा भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण केले जात आहे. उरण-पनवेल महामार्गावर इंडियन ऑइल टर्मिनलच्या समोर मागील काही दिवसांपासून जमीन सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दिवसाढवळ्या मातीचे टँकर रिकामे करून खारफुटीचा नाश केला जात आहे. भूमाफियांच्या या कारवायांकडे संबंधित विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संस्थांकडून केला जात आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी संरक्षण आणि संवर्धन कमिटीकडे या संदर्भात काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी तक्रार केली आहे. भरावाचे हे काम दिवसाढवळ्या सुरू आहे. विशेष म्हणजे याबाबत स्थानिक रहिवाशांना कोणतीही कल्पना नाही. कोणी विचारणा केलीच, तर डम्पर चालक पळून जातात, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दिवाळीची सुट्टी भूमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. त्या आडून मोठ्या प्रमाणात खारफुटीचा ऱ्हास केला जात आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत घातक असून, संबंधित विभागाने त्वरित या प्रकाराला आळा घालण्याची गरज असल्याचे मत नेटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी व्यक्त केले आहे. खारफुटी संवर्धन कमिटीने पुढाकार घेऊन खारफुटी क्षेत्राची पुनर्रचना करण्याची गरज आहे, तसेच या संदर्भात केवळ घोषणा न करता खारफुटीवरील डेब्रिज हटविल्याची खात्री करून घेणे गरजेचे असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे.विशेष म्हणजे खारफुटीचे हे संपूर्ण क्षेत्र सिडकोच्या अखात्यारित आहे. ते वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचे राज्य सरकार आणि खारफुटी संवर्धन कमिटीने सिडकोला आदेश दिले आहेत, परंतु सिडकोने या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. सिडकोच्या उदासीनतेमुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. उरण-पनवेल महामार्ग परिसरातील खारफुटीचे वीस एकर क्षेत्रावर भूमाफियांनी मातीचा भराव टाकला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, या प्रकरणी संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार केली आहे.
पर्यावरणप्रेमींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारउरण-पनवेल महामार्ग परिसरात विकासाच्या नावाखाली सुरू खारफुटी तोडप्रकरणी पर्यावरणप्रेमी संघटनांनी मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात येथील पागोटे आणि बेंडखळ परिसरात मोठ्या प्रमाणात खारफुटीचा ऱ्हास करण्यात आला होता, परंतु सध्या महामार्ग क्षेत्रात सुरू असलेला खारफुटीचा ऱ्हास हा पूर्वीपेक्षा अधिक असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या प्रती रायगड जिल्हाधिकारी व कांदळवन संरक्षण समितीलाही देण्यात आल्या आहेत.