अनधिकृत स्टाॅलसाठी नैसर्गिक नाल्यात भराव; करंजाडेतील प्रकार, सिडकोकडून दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:18 AM2021-01-25T01:18:23+5:302021-01-25T01:18:32+5:30
पावसाळ्यात वसाहतीत पाणी शिरण्याची शक्यता
कळंबोली : करंजाडे सिडको वसाहतीत अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. याकडे सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे वसाहतीला बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत पावसाळी नैसर्गिक नाल्यात स्टाॅलसाठी भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात वसाहतीत पाणी शिरण्याचे प्रकार घडू शकतात. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
करंजाडे वसाहतीची निर्मिती सिडकोकडून करण्यात आली आहे. करंजाडे वसाहतीत ६ सेक्टर त्याचबरोबर पुनर्वसन करण्यात आलेल्या रहिवाशांसाठी ५ सेक्टरची निर्मिती करण्यात आली आहे. सेक्टरनिहाय सोयी सुविधा पुरवण्यात सिडको तत्परता दाखवत आहे. पण करंजाडे परिसरात अतिक्रमणदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याकडे सिडको प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात येत आहे. विविध सिडको प्लाॅटवर अनधिकृत बांधकाम तसेच स्टाॅल शेड बांधण्यात येत आहेत. करंजाडे येथील सेक्टर आर - २मध्ये पावसाळी पाण्यासाठी नैसर्गिक नाला आहे. या नाल्यातसुध्दा स्टाॅलसाठी भराव टाकण्यात येत आहे. डेब्रीजही ठिकठिकाणी टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नैसर्गिक नाल्याचा आकार कमी होत चालला आहे. भविष्यात भराव केलेल्या ठिकाणी पाणी अडण्याचे प्रकार घडू शकतात. पाणी वसाहतीत शिरू शकते. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
डेब्रिज टाकण्याचेही प्रकार सुरूच
करंजाडे वसाहतीत अनेक बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे डेब्रिज नाल्यात आणून टाकले जात आहे. तसेच कचरासुध्दा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. अर्धा नाला डेब्रिज आणि कचऱ्यामुळे बुजला आहे, तर अर्धा नाला भरावामुळे बुजला आहे. डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे.