रायगड : राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने अलिबाग येथील सरकारी वैद्यकीयमहाविद्यालयाला अंतिम मान्यता दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर जणांच्या पहिल्या तुकडीची प्रवेशप्रक्रिया यंदा पासून सुरू हाेणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिली.रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग तालुक्यातील उसर येथील तब्बल ५२ एकर पैकी ३५ एकर जागेवर उभारण्यात येत आहे. उर्वरित जागेवर भविष्यात आयुर्वेदिक महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्याआधी लागणारे सर्व साेपस्कार राज्य आणि जिल्हा स्तरावर पूर्ण झाले आहेत. यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत आणि आरसीएफ कंपनीच्या सहा इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूवी केंद्रीय समितीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या तयारीचा आढावा घेतला हाेता. त्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली आहे, असे तटकरे यांनी सांगितले. तसेच रायगडसह कोकणातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, आरसीएफ कंपनीचे अधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
तीन वर्षांत महाविद्यालय उभारणाररायगड जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्नित ५०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक बांधकाम, यंत्रसामूग्री, पदनिर्मितीला सरकारने या आधीच मान्यता दिली आहे. पुढील तीन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे साेडचारशे काेटी रुपये खर्च येणार आहेत. सरकारने निधीची तरतूद केलेली आहे.एक हजार ७२ पदांची भरतीपुढील चार वर्षांत एकूण एक हजार ७२ पदांची निर्मिती करण्यास तसेच त्यासाठी येणाऱ्या ६१.६८ कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजुरी दिली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय तातडीने कार्यान्वित होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ ४४ अध्यापकांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याविषयीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
वैद्यकीय उपकरणांसाठी निधीची तरतूद
जिल्हा सरकारी रुग्णालयाची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी जागेचा विचार सुरू आहे. सरकारी रुग्णालयाच्या आवारातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित दुरुस्ती कामासाठी जिल्हा नियोजनमधून ३५ लाख, तर महाविद्यालयासाठी पुस्तके व नियतकालिके खरेदीसाठी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामग्री, वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी दोन कोटी ९८ लाख ५३ हजार ७९८ रुपयांच्या निधीसही मंजुरी मिळाली आहे.वैद्यकीय महाविद्यालयात ५०० खाटा आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील ३०० खाटा अशा एकूण ८०० खाटांची वैद्यकीय सुविधा जिल्ह्यात उपलब्ध हाेणार आहे. त्यामुळे रुग्णांना आता मुंबईत उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड.