आगरदांडा बंदराचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:07 PM2019-11-18T23:07:04+5:302019-11-18T23:07:09+5:30

रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ६० टक्के पूर्ण; विकासकामामुळे स्थानिकांना मिळणार रोजगार; रेल्वेमार्गाचे कामही लवकरच

The final phase of the work on the port of Agardanda | आगरदांडा बंदराचे काम अंतिम टप्प्यात

आगरदांडा बंदराचे काम अंतिम टप्प्यात

Next

मुरुड जंजिरा : केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून २०२० पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण होतील व दिघी बंदराप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे ३५०० कोटींची गुंतवणूक असणाºया आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराच्या विकासावर भर दिला जात असून बंदराला आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर प्रशासनाचा जोर दिसून येत आहे.

आगरदांडा येथून मोठ्या जहाजातून उतरणारा माल विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिट चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असून ६० टक्के काम आतापर्यंत झाले आहे. सावली ते मांदाड पुलापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर तळे ते इंदापूरचेसुद्धा काम प्रगतिपथावर आहे.

आगरदांडा हे गाव पूर्वीपासून वसलेले असून चौपदरीकरणात स्थानिकांच्या घराला धक्का पोहोचू नये, यासाठी डोंगर फोडून अंतर्गत भुयारी मार्गाद्वारे थेट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आगरदांडा येथून रोहा येथे रेल्वे रूळ टाकण्याचासुद्धा बंदर विकासात समावेश असून पुढील टप्यात हे काम मार्गी लागणार आहे.

आगरदांडा बंदर जेएनपीटी हस्तांतरित करणार, असा कल होता. परंतु आता सदरचे बंदर अदानी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज् घेणार असल्याचे दिघी पोर्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंदराच्या विकासाठी लागणाºया सर्व पूरक बाबी तातडीने पूर्ण करण्याचा केंद्र शासनाचा कल आहे. काँक्रिट रस्त्याप्रमाणे लवकरच रेल्वे विकासाचे कामसुद्धा मार्गी लागणार आहे. जहाजातून उतरवलेला माल रेल्वे व रस्त्याद्वारे नियोजित ठिकाणी पोहोचविण्यासाठी पूरक मार्ग पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. दिघी आगरदांडा बंदर संपूर्ण विकसित झाल्यावर मुरुड तालुक्याचे महत्त्व वाढणार असून नवीन औद्योगिक क्रांती होणार आहे. स्थानिकांना रोजगार देण्यात येणार आहे.

जहाजातून माल उतरवण्याची लागणारी विविध पदेसुद्धा येथे भरली जाणार आहेत. बंदराच्या विकासावर केंद्र सरकार कोट्यवधींची गुंतवणूक करून एक मोठे विशाल बंदर विकसित करीत आहे. बंदराच्या विकासामुळे स्थानिकांना चांगले रस्ते त्याचप्रमाणे रेल्वे सुविधेचा लाभ मिळणार आहे. रस्त्याची कामे पूर्ण होताच रेल्वेच्या कामाला गती येणार आहे. सदरचे बंदर लवकरच विकसित होऊन स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा स्थानिक सुशिक्षित तरुणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या दिघी पोर्टचे काम काही अंशी पूर्ण झाले असून येथे तुरळकच जहाजे येतात. परंतु आगरदांडा बंदराचा विकास झाल्यास मोठ्या जहाजांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे मुरुड तालुक्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे. काँक्रिट रस्त्याची कामे वेगाने सुरू असून बदलत्या घडामोडीमुळे लवकरच बंदर परिसराचा कायापालट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The final phase of the work on the port of Agardanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.