अखेर ४५०० विद्यार्थ्यांना मिळाले शिष्यवृत्तीचे पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:01 AM2018-10-21T03:01:43+5:302018-10-21T03:01:54+5:30
अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील ४५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे अखेर जमा झाले आहेत.
मुरुड जंजिरा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील ४५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे अखेर जमा झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून तंत्रशिक्षण संस्थेत जे अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रु पयांची शिष्यवृत्ती दिली जाते; परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. वारंवार प्रशासकीय दरबारी फेºया मारून विद्यार्थीही वैतागले होते. शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांच्यासह अनेक पालकांनी भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष शाहनवाज मुकादम यांची भेट घेऊन समस्या मांडली. यातील काही विद्यार्थी हे अब्दुल रझाक काळसेकर तंत्रशिक्षण महाविद्यालयातील होते.
मुकादम यांनी विद्यार्थ्यांची समस्या ऐकून तातडीने भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जमालभाई सिद्धिकी यांच्याशी संपर्क साधला. सिद्धिकी यांनी डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशनचे कार्यालयीन अधीक्षक सुंदर बुलानी यांच्याशी चर्चा करून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक न केल्यामुळे पैसे जमा न झाल्याचे सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पैसे न मिळाल्यामुळे खर्चाचा बोजा वाढला आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीसुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन विद्यार्थ्यांना तातडीने पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले, त्यानुसार सुमारे ४५०० विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत.