श्रीवर्धन : उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया होत नसल्याने, श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील अनेक रुग्णांना अलिबाग किंवा महाडकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
श्रीवर्धनपासून महाड, अलिबाग अंतर जास्त असल्यामुळे गर्भवती महिला व बाळाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते, तसेच उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ स्त्री प्रसूती तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन श्रीवर्धनमधील जनतेने तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे दिले होते. त्याबाबतचे वृत्तही ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे जाग्या झालेल्या प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ स्त्री प्रसूती तज्ज्ञाची नियुक्ती के ली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक रुग्णांना प्रसूती शस्त्रक्रियेसाठी अलिबाग व महाड या ठिकाणी पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, स्त्री प्रसूती तज्ज्ञ व भूलतज्ज्ञांच्या अभावी रुग्णांना अलिबाग व महाडला पाठवावे लागत आहे, असे सांगितले.
५ जुलैपासून उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया बंद होती. श्रीवर्धनमधील धोंड गल्लीतील रहिवासी कृष्णा रटाटे यांची मुलगी ऋषाली जोशी (२४) हिस प्रसववेदना सुरू झाल्यानंतर, उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठवले असता, स्त्री प्रसूती तज्ज्ञाअभावी महाडमधील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर, १९ जुलै रोजी रटाटे यांची द्वितीय कन्या रूपाली चोगले हिस उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे प्रसूतीसाठी नेले असता, डॉक्टरांनी तिलाही शस्त्रक्रियाची गरज आहे, त्यामुळे महाडला पाठविण्यास सांगितले. मात्र, गर्भवती महिलेच्या पतीने रूपाली यांना श्रीवर्धनमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या प्रसंगी डॉक्टरांनी रूपालीची प्रसूती नॉर्मल पद्धतीने केली. कृष्णा रटाटे यांना त्यांच्या दोन्ही मुलींच्या प्रसूती प्रसंगी मोठ्या स्वरूपात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांना प्रसूती शस्त्रक्रिया नाकारली जात असल्याचे बाब श्रीवर्धनमधील जनतेच्या निदर्शनास आली. त्यानंतर, मनोज गोगटे, सुनिल पवार प्रीतम श्रीवर्धनकर, जुनेद दुस्ते यांनी उपजिल्हा रुग्णालयातील असुविधांविषयी श्रीवर्धन तहसीलदारांना निवेदन सादर केले.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदाविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संवाद साधला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर एम.डी.ढवळे रजेवर असल्याने प्रसूती शस्त्रक्रिया बंद होत्या. त्या कारणास्तव डॉक्टर ढवळे यांच्या रजा कालावधीदरम्यान प्रसूती शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टरांची तात्पुरत्या काळासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. या बाबीचा एक आठवड्यापासून पाठपुरवठा केलेला आहे. श्रीवर्धनमधील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.- अनिकेत तटकरे, आमदार
उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोईसुविधा उपलब्ध असाव्यात, गर्भवती महिलांना कोणताही त्रास होऊ नये, प्रसूती शस्त्रक्रिया श्रीवर्धनमध्येच व्हाव्यात. महाड किंवा अलीबागला जाणे त्रासिक आणि खर्चिक आहे. सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार.- कृष्णा रटाटे, रहिवासी, श्रीवर्धनकोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या दवाखान्यात प्रसूती शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी धावाधाव करावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे.- प्रीतम श्रीवर्धनकर, नगरसेवक, नगरपरिषद, श्रीवर्धन
‘लोकमत’चे यश
उपजिल्हा रुग्णालयातील सोईसुविधांच्या अभावीविषयी दोन दिवस सातत्याने ‘लोकमत’ने लावू धरले. त्यानंतर, आमदार अनिकेत तटकरे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेचा आढावा घेतला व त्यानुसार रिक्त पदे तत्काळ भरली जातील, असे सांगितले. त्यानुसार, रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संवाद साधून, उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रियेसाठी तत्काळ दोन डॉक्टरांशी तात्पुरत्या काळासाठी नेमणूक करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री प्रसूती तज्ज्ञ ३१ जुलैपर्यंत रजेवर आहेत.