दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर येथे दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्याबरोबर चिखलातून ये-जा करावी लागते. समुद्रकिनारी जाणारा मुख्य मार्ग असल्याने नेहमीच रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन अखेर दिवेआगर ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे.
निळाशार, नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. पावसाळ्यात पर्यटन हंगाम कमी असला तरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते. मात्र, समुद्रकिनारी खड्डेमय रस्त्याबरोबर चिखलातून पर्यटक व स्थानिकांना चालावे लागायचे. सध्या हा रस्ता खड्डेमुक्त होऊन नव्याने डांबरीकरण झाल्याने पर्यटक व स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटक दिवेआगर समुद्रकिनाऱ्याला पसंती देतात. मुख्य रस्त्याची ग्रामपंचायतच्या पुढाकाराने दुरुस्ती झाल्याने या भागातून ये जा करणे सोयीचे झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पक्क्या रस्त्यांची मागणी दिवेआगर प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. एका बाजूला शासन पर्यटकांच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविते. तर दुसऱ्या बाजूला तेच उपक्रम निधीअभावी फोल ठरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. दिवेआगर समुद्रालगत जाणारे रस्ते पक्क्या स्वरूपात करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.