जत्रौत्सवामुळे नागरिकांना अर्थिक आधार
By निखिल म्हात्रे | Published: November 20, 2022 03:34 PM2022-11-20T15:34:44+5:302022-11-20T15:35:05+5:30
लाखाच्या घरात पाच दिवसात उड्डाणे करणार्या अलिबाग तालुक्यातील वरसोली येथी विठोबा मंदीरातील यात्रेला तरुणाई सह मध्यमवर्गीयांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
अलिबाग - गावची जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते खेळणी, खाऊचे गाळे, सेल्फी स्टिक्स, गॉगल यांचे फिरते विक्रेते. अगदी कानातल्यापासून मोबाइल कव्हपर्यंत आदी सर्व वस्तू मिळण्याचे ठिकाण. तर दुसरीकडे मनोरंजनात्मक आकाश पाळणे, नागमोडी खेळ, तर मिकीमाऊस सारख्या विविध खेळण्यांनी वरसोली गावातील परीसर गजबजून गेला आहे.
लाखाच्या घरात पाच दिवसात उड्डाणे करणार्या अलिबाग तालुक्यातील वरसोली येथी विठोबा मंदीरातील यात्रेला तरुणाई सह मध्यमवर्गीयांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या प्रवेशद्वारावरच पहिली भेट होते ती गॉगल विक्रेत्याशी. तिथून पुढे गळ्यात अडकवायचे रंगीबेरंगी रुमाल विक्रेता दिसतो. प्रवेशद्वाराच्याच ठिकाणी खेळणी, फुगे, पिपाण्या, कानातले विकणारे फिरते विक्रेते या सगळ्या गर्दीतून आपण बरोबर पत्त्यावरच आलो आहोत याची खातरजमा करून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुरुवातीलाच खारे दाणे आणि लिमलेटच्या गोळ्यांची विक्री करणारा गाळा.
सेल्फी स्टिक्स विक्रेत्यांची तर या पाच दिवसाच्या यात्रेत दिवाळीच होती. बघावे तिथे सुरू असलेले फोटो सेशन. पोलिसांची नजर चुकवून यात्रेत प्रवेश केलेला आणि गर्दीत मिसळून आपले काम शांतपणे करणारा भिकारीही. दुसर्या बाजूला खाण्याच्या पदार्थाच्या गाळ्यांवर असलेली मोठी गर्दी. दोन मिनिटे एखाद्या ठिकाणी थांबल्यावर कोणता पदार्थ छान आहे. याच्या कानावर पडणार्या चर्चा. या सगळ्यातून ग्रंथदालनाचीही सुटका झाली नाही.
ग्रंथदालनातही भिंग, औषधी तेल, शोभेच्या वस्तू, टूलकिट, संगणक साफ करण्याची उपकरणे अशा वस्तूंच्या गाळ्यांवर गर्दी दिसत होती. यात्रेत येणा-या तरुणाईने मनोरंजनासाठी आकाश पाळणे, नागमोडी खेळ, लहान मुलांसाठी मिकीमाऊसचे खेळ, टोराटोरा तसेच विविध मनोरंजनाचे खेळ या जत्रेत पहावयास मिळत होते. याबरोबरच या खेळाचा आनंद ही सर्वजण लहान होत लुटत असताना पहावयास मिळत होते.
जत्रेत काय काय मिळत होते?
लिमलेटच्या गोळ्या, खारे दाणे, पाणीपुरी, कुल्फी, वडापाव असे खाद्यपदार्थ, पिपाण्या, गॉगल, रंगीबेरंगी रुमाल, सेल्फी स्टिक्स, कानातले, लहान मुलांची खेळणी, भिंग, औषधी तेल, शोभेच्या वस्तू, यंत्र दुरुस्तीची उपकरणे, संगणक स्वच्छ करण्याची उपकरणे आदी.
लाकडी खेळणी पडद्याआड
लहान मुलांना कुठल्याही खेळण्यांचे प्रंचड आकर्षण असते मग ती खेळणी लाकडी असतो की प्लास्टिकची. मध्यंतरी चीन मधून आलेली प्लास्टिकची काही खेळणी मुलांनी तोंडात घातल्याने काही बालकांना विषबाधा झाली असे ऐकले आहे. कारण प्लास्टिकची खेळणी बनविण्यासाठी जे रंग वापरले होते त्या रंगात जस्त, कथिल अशी विषारी खनिजे होती. लहान मुलांच्या सवयीप्रमाणे त्यांनी ती खेळणी हातास लागताच तोंडात घालण्यास सुरवात केली. त्यामुळे लाकडी खळणी मात्र आज पडद्याआड गेली.
वर्षातील शेवटचे दोन महीने म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर हा महीना जत्रौत्सवाचा असल्याने आम्हा तरुणाईसाठी एक आनंद देणारी पर्वणीच असते. या जत्रौत्सवात मनोरंजनाचे विविध खेळ असल्याने एक नवा आनंद अनुभलायला मिळतो. त्यामुळे हा जत्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे अमेय घरत यांनी सांगितले.