मधुकर ठाकूर, उरण : उरण शहरातील रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी लागलेल्या आगीत शेजारीच राहणाऱ्या परेश तेरडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुलीच्या लग्नाच्या कामांची लगबग सुरू असतानाच आगीच्या ज्वाळांनी घरातील झालेल्या लाखों रुपयांच्या नुकसानीमुळे मुलीचे लग्न कसे पार पाडायचे याचीच चिंता तेरडे यांना सतावते आहे.
उरण शहरात २६ भंगाराची दुकाने आहेत.शहरातील बोरी-पाखाडी येथील विविध शासकीय जागांवरच तर भंगारांच्या दुकानांचा विळखाच पडला आहे. दलदलीची असो की मोकळी जागा दिसली रे दिसली कि त्या जागेवर परप्रांतीयांनी भंगाराचे दुकान टाकले म्हणून समजा.भंगारचे दुकान उभारणे आता खार्चिक राहिले नाही.जुने वासे, बांबू आणि जुनी पत्रे असली की भंगाराचे दुकान,गोदाम तयार.मात्र स्थानिक पुढारी नेते , स्थानिक पोलीस, प्रशासन यांना महिनाकाठी चिरिमिरी दिल्याखेरीज ही भंगाराची दुकाने अस्तित्वात येत नाहीत.दुदैवाने हेही तितकेच खरे आहे.मात्र दररोज मोठ्या प्रमाणावर भंगार खरेदी करून कुठून आणतात आणि कुठे विकतात यांचा अंदाज कुणालाच लागलेला नाही.अशा या मोठ्या प्रमाणावर अचानक उगवून नंतर कायम अस्तित्वात येणाऱ्या भंगारांची दुकाने, गोदामांविरोधात आजुबाजुला राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी केल्या असल्या तरी त्याकडे कायमच दुर्लक्षच केले जात असल्याची तक्रारदारांचीच तक्रार आहे.
स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काय अनर्थ होऊ शकतो याचे शुक्रवारी रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला लागलेली भीषण आग एक विदारक उदाहरण आहे. शुक्रवारी (२७) बोरी स्मशानभूमी शेजारीच असलेल्या रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्यागोदामाला भीषण आग लागली.या आगीत प्लास्टिक, लाकडाचे पॅलेट, प्लायवूड, केबल,रासायनिक केमिकलचे ड्रम, लोखंड आणि ज्वालाग्राही पदार्थांनीपेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.या आगीत गोदामाच्या आजुबाजुला असलेली अनेक घरे, इमारती धोक्यात आल्या.
गोदामाच्या कंपाऊंडच्या बाजूलाच असलेल्या परेश तेरडे यांच्या इमारतीलाही आगीच्या ज्वाळांनी घेरले आणि पाहता पाहता घरातील सामान आगीच्या ज्वाळांनी वितळून गेले.तेरडे यांच्या मुलीचे लग्न ७ डिसेंबर रोजी ठरले आहे.यासाठी त्यांच्या इमारतीतील प्लॉटमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरु होती. प्लॉटमध्ये रंगरंगोटी करण्यात आली होती.१५-१८ लाख रुपये खर्चून नवीन फर्निचरही बनवून घेतले होते.मुलीच्या लग्नासाठी नवीन सामान, कपडेलत्तेही खरेदी करून ठेवण्यात आले होते.प्लॉटमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच शेजारीच असलेल्या रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली.या आगीत इमारतीच्या खिडकीच्या तावदानांना तडे गेले.आगीच्या ज्वालामुळे आणि पाहता पाहता घरातील नव्याने बनवून घेण्यात आलेले फर्निचर ,फ्रीज, टीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक सामान, रंगरंगोटी केलेल्या भिंती,फरशा,सायकल आगीच्या ज्वाळांनी वितळून गेल्या आहेत.या आगीत परेश तेरडे यांचे सुमारे ३० लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.
मुलीच्या लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच खर्च केलेले ३० लाख आगीत स्वाहा झाल्याने मुलीच्या लग्नाच्या खर्चाची चिंता भेडसावत असल्याने परेश तेरडे चिंतेत सापडले आहेत.मागील १५-२० वर्षांपासून या अनधिकृत भंगाराच्या गोदामांविरोधात आजुबाजुच्या रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.त्यांच्यावर पण.पोलिस व स्थानिक प्रशासनाकडे कारवाईची अपेक्षा असताना मात्र भंगार माफियांकडूनच धमक्या दिल्या जात होत्या.अशी खंत परेश तेरडे यांनी व्यक्त केली आहे.
परप्रांतीयांच्या वाढत्या दादागिरीला पोलिस व स्थानिक प्रशासनच अधिक जबाबदार असल्याचाही तेरडे यांचा आरोप आहे. नुकसानभरपाई मिळावी यासाठी नुकतीच रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील, उरण शहर अध्यक्ष प्रकाश पाटील आणि महाआघाडीच्या स्थानिक नेत्यांनी परेश तेरडे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त झोपड्यांचीही पाहणी केली.