दिघोडेतील गोदामात एसी कंटेनरला आग, कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 03:34 AM2019-02-18T03:34:01+5:302019-02-18T03:34:22+5:30

कोट्यवधींचे नुकसान : जीवितहानी टळली; १६ तासांनंतरही आगीचा दाह, धूर सुरूच

Fire damage to AC containers in Dighode godown, billions of losses | दिघोडेतील गोदामात एसी कंटेनरला आग, कोट्यवधींचे नुकसान

दिघोडेतील गोदामात एसी कंटेनरला आग, कोट्यवधींचे नुकसान

Next

उरण : तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी लागलेल्या भीषण आगीत ८० एसीचे भरलेले कंटेनर आणि सुमारे पाच हजार एसीचे सिलिंडर जळून खाक झाले आहेत. गोदामातील टायरचा साठा त्वरित बाहेर काढल्यानंतर अग्निशमन दलाच्या दहा बंबाच्या साहाय्याने आग नियंत्रणात आली असली, तरी १६ तासांनंतर, रविवार दुपारनंतरही आग आणि धूर सुरूच आहे. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक झाली आहे.

दास्तान-उरण येथील अहमद हवा यांच्या मालकीचे डब्ल्यू वेअर हाउस आहे. दीड वर्षांपूर्वी तीन एकर क्षेत्रात हे वेअर हाउस उभारण्यात आले आहे. विविध मालाचा साठा असलेल्या गोदामाला शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात असलेल्या कंटेनरमध्ये असलेले 80 एसी मशिन, एसीमध्ये गॅस भरण्यासाठी असलेले सुमारे पाच हजार सिलिंडर आणि केमिकल्सचे ३०० ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.

आगीची माहिती मिळताच, प्रशासनाच्या मदतीने रात्रीपासून सिडको, जेएनपीटी आणि इतर एजन्सीच्या अग्निशमन दलाच्या दहा बंबांनी आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले होते. मोठ्या शर्थीनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमनला यश आले असले, तरी १६ तासांनंतरही छोट्या-छोट्या प्रमाणात आगीचे सत्र सुरू आहे. आगीबरोबरच मधूनच धुराचे लोळ उठत आहेत. आगीदरम्यान या गोदामात ठेवलेले हजारो टायर बाहेर काढण्यात आल्याने आग नियंत्रणात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आगीतील सिलिंडरच्या स्फोटामुळे रात्रभर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दिघोडे हद्दीतच १६ कंटेनर गोदाम आहेत. मात्र, बहुतांश गोदामात सुरक्षिततेसाठी कोणतीही आवश्यक यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्याही यंत्रणा नसल्याने तहसील, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणा गोदाम चालविण्यासाठी कोणत्या आधारे परवानग्या देतात, असा प्रश्न दिघोडेच्या सरपंच सोनिया घरत यांनी उपस्थित केला आहे. डब्ल्यू वेअर हाउसचे मालक अहमद हवा यांच्याकडे याबाबत ग्रा.पं.ने अनेकदा लेखी पत्राद्वारे विचारणा केली. मात्र, ग्रामपंचायतीच्या पत्राला कोणताही प्रतिसाद न देता केराची टोपलीच दाखविली. ग्रा.पं. फक्त बांधकामाला परवानगी देते. मात्र, इतर आवश्यक शासकीय परवानग्या विविध शासकीय विभागाकडून दिल्या जातात.

गोदाममालक विमा कंपन्यांचे साटेलोटे?
उरण परिसरात गोदामात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे संशयाचे वातावरण आहे. आजही विविध विमा कंपनीचे एजंट, अधिकारी शासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याआधीच हजर आहेत, त्यामुळे आगीच्या घटनांमागे मालक आणि विमा कंपन्यांशी आर्थिक साटेलोटे जुळले असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय उरण पंचायत समितीच्या सदस्या दिशा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तर परिसरात असलेले १६ कंटेनर गोदाम नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घातक ठरत आहेत. येथील प्लॅटिनम या केमिकल साठवणूक करण्यात येत असलेल्या गोदामामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, शासकीय अधिकाºयांशी साटेलोटे असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप नीलेश पाटील या ग्रामस्थाने केला आहे.

दिघोडे येथील गोदामाला लागलेली आग आटोक्यात आली असून, पंचनाम्यानंतरच आर्थिक नुकसानीचा आकडा निश्चितपणे सांगता येईल.
- कल्पना गोडे, तहसीलदार, उरण

आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीच्या कारणाची चौकशी करण्यात येत आहे.
- एन. बी. कोल्हटकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

Web Title: Fire damage to AC containers in Dighode godown, billions of losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड