पेणमध्ये खत-बियाण्याच्या दुकानाला आग, ३६ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:14 AM2019-05-26T00:14:16+5:302019-05-26T00:14:19+5:30
पेण एसटी स्थानकाजवळील अंतोरा रस्त्यावर असलेल्या खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली.
पेण : पेण एसटी स्थानकाजवळील अंतोरा रस्त्यावर असलेल्या खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. यात खते, बियाणे व कीटकनाशके अशी सामग्री खाक झाली. आगीमुळे अंदाजे ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शॉटसर्किटमुळे दुकानाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून अधिक पेण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस यंत्रणेला आगीबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पेण नगरपरिषद तसेच जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशामक दलाना पाचारण केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास ३६ लाखांची वित्तहानी झाली आहे.
पेणमधील बसस्थानकाजवळ असलेल्या समर्थ खत आणि बियाणे विक्री केंद्र आहे. या ठिकाणी दोन गाळ्यात खत, बियाणे व कीटकनाशकाचे दुकान व गोदाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. चाळीवजा या इमारतीत काही कुटुंबेही वास्तव्यास आहेत. जि. प. सदस्य प्रभाकार म्हात्रे यांच्या कुटुंबीयाच्या मालकीचे हे दुकान असून त्यांचे बंधू दिनेश म्हात्रे हे या दुकानाचे कामकाज पाहतात. नेहमीप्रमाणे रात्री ८.०० च्या सुमारास दुकान बंद करून वडखळ येथे घरी गेल्यानंतर रात्री ही घटना घडली. या आगीच्या घटनेत दुकानातील इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर इतर साधनसामग्री यांच्यासह खरीप खरेदी करून भरलेला हंगामासाठी लाखो रुपये किमतीच्या बियाण्यांचा साठा खाक झाला. नुकसान पंचनाम्याचे काम पेण तलाठी शिवाजी ताबले यांनी केले.