माणगाव : माणगाव तालुक्यातील साई मोहल्ल्यातील रहिवासी रहमत हमजाअली कोंडविलकर यांच्या राहत्या घराला शुक्रवारी रात्री १२.१५च्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी आगीत लाखो रु पयांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. साई ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु या आगीने भीषण रूप धारण केल्यामुळे संपूर्ण घर भस्मसात झाले आहे. आग विझविण्यासाठी रोहा व महाड या ठिकाणावरून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या होत्या; परंतु तोपर्यंत संपूर्ण घर व घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते.
आगीमध्ये घरातील तीन गोदरेज कपाट, एक लाकडी कपाट, चार बेड, एक दिवान, दोन डायनिंग टेबल, दोन ड्रेसिंग टेबल, एक फ्रीज, एक वॉशिंग मशीन, एक टीव्ही, दोन घरगुती पीठाच्या चक्क्या, एक एअर कुलर, सहा सिलिंग फॅन, दोन टेबल फॅन, एक शिलाई मशीन, तीन गॅस शेगडी, चार मोबाइल, चांदी दोन किलो, सोने २० ग्रॅम, कौटुंबिक संपूर्ण भांडी, सर्व कपडे, संपूर्ण अन्नधान्य, लाइट फिटिंग, संपूर्ण घराची कौले, लाकूड, जळून खाक झाले आहे. असा माणगाव तहसील कार्यालयाकडून तलाठी चंद्रकांत बंदपट्टे यांनी ५३,१२,६००/- रु पयांचा पंचनामा घटनास्थळी येऊन केला. शासनाकडून याबाबत लवकरच दखल घेऊन या कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.