तळोजा एमआयडीसीत आगीचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:14 PM2019-12-14T23:14:55+5:302019-12-14T23:21:41+5:30
मोकळ्या जागेवर बेकायदा डम्पिंग; दोन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात
पनवेल : तळोजा एमआयडीसीमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. पडघे गावाजवळील कासाडी नदीच्या किनाऱ्यालगत मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या रासायनिक कचºयाला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. सुमारे दोन तास ही आग सुरूच होती. अखेर अग्निशमन दलाने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
संबंधित रासायनिक व केमिकल मिश्रित कचरा अनेक दिवसांपासून नोव्होटर इलेक्ट्रिक व डिजिटल सिस्टीम प्रा. लिमिटेड या दोन कारखान्यांना लागून असलेल्या मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आला होता. यासंदर्भात तळोजा विभागातील काँग्रेसचे पर्यावरण सेलचे सुनील भोईर यांनी पनवेल महानगरपालिका व एमपीसीबीला लेखी तक्रारही केली होती.
तळोजा एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांच्या मार्फत अनधिकृत हा कचरा येथील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. नजीकच्या काळात हा प्रकार सर्रास वाढला असल्याचे भोईर यांनी सांगितले. मात्र, या प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे अखेर या ठिकाणी आग लागलीच.
आग लागल्यानंतर दोन तास मोठ्या प्रमाणात आगीचा भडका झाल्याने या भूखंडालगत असलेल्या कारखान्यांनाही आगीचा धोका निर्माण झाला होता. मात्र, तळोजा एमआयडीसीमधील अग्निशमन दलातील पाच कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले.
संबंधित आगीचा भडका झाल्यानंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केली होती. तळोजा एमआयडीसीमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
प्रत्येक महिन्याला एमआयडीसी वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. काही घटनांना तांत्रिक कारण असते, तर काही घटना या स्वत: आगीला निमंत्रण दिल्यासारख्या असतात. आजची घटना ही धोकादायक रासायनिक कचरा उघड्यावर डम्प केल्याने घडली आहे.
रासायनिक कचरा टाकणाºया कारखान्यांवर कारवाईची मागणी
आग लागलेल्या मोकळ्या भूखंडावर रासायनिक कचरा कशाप्रकारे आला? अशाप्रकारे धोकादायक पद्धतीने उघड्यावर टाकलेल्या या रासायनिक कचºयाला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण? या भूखंडावर पडलेल्या कचºयाचे नमुने घेऊन यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेस पर्यावरण सेलचे सुनील भोईर यांनी केली.