नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील अग्निशमन केंद्राच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला पालिकेने सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी सुमारे पावणेसात कोटी रुपये खर्चून अग्निशमन केंद्राची तीन मजली इमारत उभी राहणार आहे. ही इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पाच बंब उभे राहू शकणार आहेत.पालिकेतर्फे अग्निशमन केंद्रांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीवर जोर दिला जात आहे. ज्या ठिकाणी ही केंद्रे चालवली जात होती, त्या ठिकाणच्या इमारती जीर्ण झाल्याने अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांनाच जीव मुठीत धरून राहावे लागत होते, यामुळे वाशी केंद्राचे काम हाती घेतल्यानंतर कोपरखैरणेत नवे केंद्र बांधण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सीबीडी बेलापूर येथील अग्निशमनकेंद्राच्या नव्या इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी पालिकेतर्फे या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार, परिवहन सभापती रामचंद्र दळवी, सभागृहनेते रवींद्र इथापे, नगरसेवक जयाजी नाथ, नगरसेवक अनंत सुतार आदी उपस्थित होते.बेलापूर सेक्टर १ ए येथील १६९०.९२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या सहा क्रमांकाच्या भूखंडावर हे सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारले जात आहे. त्या ठिकाणी पाच मोठे बंब तसेच १९ चारचाकी वाहन पार्किंगची सोय असणार आहे. तर इमारतीमध्ये नियंत्रण कक्षासह अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सदनिका व भांडार कक्षाची सोय असणार आहे. त्याचप्रमाणे बेलापूर सेक्टर ३ ए येथील लायन्स पार्कमध्ये ज्येष्ठ नागरी विरंगुळा केंद्र व भाजी मार्केटचे लोकार्पणही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
बेलापूरमधील अग्निशमन केंद्र होणार अद्ययावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:55 AM