नागोठणे : शहरातील शिवाजी चौकात शुक्रवारी मध्यरात्री एका दुकानाला आग लागली. त्यामुळे सर्व वस्तूंसह संपूर्ण माल खाक झाला. रिलायन्स कंपनीच्या तीन आणि रोहा एमआयडीसीच्या एका अग्निशमन बंबाने तासाभरात आगीवर नियंत्रण आणल्याने शेजारील दुकाने आगीपासून वाचली. दुर्घटनेत १० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.येथील ब्राह्मण आळीत राहणारे अशोक पटेल यांचे एसटी बसस्थानकालगत शिवाजी चौकात एक दुकान असून ते गोळ्या, बिस्कीट, तंबाखू, विडी, सिगारेट, चॉकलेट आदींच्या घाऊक विक्र ीचा व्यवसाय करतात. मध्यरात्री दीडच्या सुमारास दुधाची गाडी या मार्गावरून जात असताना दुकानाला आग लागल्याचे गाडीतील माणसांच्या लक्षात आले. त्यांनी ओरडून परिसरातील जनतेला जागृत केले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रिलायन्सचे तीन तर रोहा एमआयडीसीचा एक बंब काही क्षणात याठिकाणी दाखल होऊन त्यांनी काही वेळात आगीवर नियंत्रण आणले. आग लागलेल्या दुकानाच्या दोन्ही बाजूला चपलांची मोठी दुकाने असून त्यालगत हॉटेल, हार्डवेअर, दूध डेअरी तसेच किराणा मालाची दुकाने आहेत. आग बाजूला न पसरल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत दुकानाच्या जागेसह आतमध्ये असलेला १० लाखांचा माल पूर्णपणे नष्ट झाला आहे.
नागोठण्यातील आगीत दुकान खाक, १० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:09 AM