गिरीश गोरेगावकर गोरेगाव : महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगाव तालुक्यातील डोंगरोली येथे विकसित करण्यात आली आहे. ही नर्सरी तरुण उद्योजक आनंद पत्की यांनी मोठ्या कल्पकतेने तयार केली आहे. नर्सरीत ग्रीन गोल्डच्या २४ प्रकारच्या जातींचे बांबू आहेत. त्यांनी भारत देशातील विविध राज्यांतून बांबूच्या प्रजाती आणून पहिली बांबू नर्सरी उभारली आहे. त्यासाठी ते विविध राज्यात जाऊन विकसित बांबू जातींचा अभ्यास करून आले आहेत. त्यांच्या नर्सरीतील दक्षिण पूर्व आशियातील उष्ण कटिबंधातील घनदाट वृक्ष जातीतील डेंड्रोकॅलॅमस जाएजांटस किंवा ड्रॅगन बांबू ही जात सध्या लक्षवेधी ठरत आहे. हा जगातील सर्वात मोठा बांबू प्रकार असून, तिचा घेर अंदाजे एक फूट होतो, तर त्याची उंची १०० फूट वाढते. साधारण सहा वर्षांत हा बांबू पूर्णपणे वाढतो. या बांबूची किंमत एक हजार ते दोन हजार होते. त्याचे आयुष्य ६० ते ७० वर्षे असते. एका बांबूच्या रोपापासून दरवर्षी कमीत कमी सहा ते आठ बांबू तयार होतात. चांगल्या जातीची ३५० रोपटी लावली की, त्यापासून २१०० बांबू तयार होतात. एका बांबूचे वजन १०० ते १२० किलो होते, म्हणजेच दोन लाख ५२ हजार किलो टिंबर तयार होते. त्यामुळे सहा वर्षांनंतर अनेक पिढ्यांना या बांबूपासून दरवर्षी वाढीव उत्पन्न मिळत जाते. या बांबूचे उत्पन्न घेणारी व्यक्तीची पुढील पिढी बसून उपन्न मिळवणार आहे.कोकणातील पारंपरिक बांबू ५० ते ६० रु पयाला विकत मिळतो. मात्र, एक बांबू तोडण्यासाठी २० ते ३० रु पये खर्च येतो. विकसित बांबू नर्सरी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, ते कुठेही लावू शकतो. विशेष म्हणजे, बांबूच्या रोपांना आणि झाडांना पाणी कमी लागते. पत्की यांच्या नर्सरीमध्ये रोपांचीही निर्मिती केली जाते. या रोपांची किंमत २०० ते ३०० रु पये आहे. शेतकऱ्यांनी ही रोपे लावून अनेक पिढ्या उत्पन्न मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या या रोपाना आॅनलाइन मागणी आहे. बांबूची रोपे मोठ्या कष्टाने मिळतात. या बांबूच्या झाडांना ६६ आणि ९९ वर्षांनी एकदाच फुले येतात. त्यामुळे बरेच वर्षे रोपे मिळविण्यासाठी वाट पाहावी लागते.माणगाव तालुक्यातील डोंगरोली हे गाव मुंबईपासून १५२ कि.मी.वर आहे. पुण्यापासून १०० कि.मी.वर आहे. पत्की यांनी १४ एकरांमध्ये ही नर्सरी उभी केली आहे. त्यामध्ये २४ प्रकारच्या ग्रीन गोल्ड जाती आहेत. मुंबई महामार्गापासून सात कि.मी.वर डोंगरोली हे गाव असून, नर्सरीच्या सभोवती घनदाट झाडी असून, बांबू संवर्धनासाठी अनकूल हवामान आहे. दरवर्षी या भागात दोन हजार मि.मी. पाऊस पडतो; परंतु पाणी साठत नाही. यासाठी पत्की यांनी दोन तलाव बांधले आहेत. शिवाय पॉलिहाउस व शेडनेट बांधले आहे. बांबू ही वनस्पती नैसर्गिक कठीण परिस्थितीत चांगल्या प्रकारे जगू शकते. साधारण तीन वर्षांनी हे झाड बºयापैकी तयार होते. सहा वर्षांनंतर तोडणी दरवर्षी करू शकतो, असे पत्की यांनी सांगितले.>भारतात बांबूचे ४.६ दशलक्ष टन उत्पादन होते. त्यापैकी १.९ दशलक्ष टन उत्पादन पल्प (लगदा) उद्योगात होते. केंद्र सरकारने बांबू संवर्धन करणाºया खेड्यांलगत १०८ मार्केट्स तयार केली आहेत.या शेतीसाठी ऊर्जेची गरज होती, म्हणून त्यांनी पवन चक्कीद्वारे दहापट वीज स्वस्त पद्धतीने निर्माण करून, बांबू व्यवसायात लोकप्रिय होण्यासाठी व्यापारपेठेत सहभागी घेतला. शेतकºयांना बांबू लागवड करणे, नर्सरी तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, उत्पादकांना मार्केट देणे, प्रोत्साहन, आर्थिक मदत यासाठी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगावातील डोंगरोलीमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:19 AM